इंधनाच्या वाढत्या दरांबाबत विचारला प्रश्न तेव्हा रामदेवबाबा भडकले आणि म्हणाले.....

जाणून घ्या काय म्हणाले आहेत योगगुरू रामदेवबाबा
इंधनाच्या वाढत्या दरांबाबत विचारला प्रश्न तेव्हा रामदेवबाबा भडकले आणि म्हणाले.....

योगगुरू रामदेवबाबा यांना इंधनाच्या वाढत्या दरांबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा ते चांगलेच भडकले. त्यासंदर्भातला एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. मागच्या दहा दिवसांमध्ये नऊवेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. रामदेवबाबा यांची पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना या वाढत्या इंधन दरांविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचा पारा चढला.

काय म्हणाले रामदेवबाबा?

'मला असे प्रश्न मुळीच विचारायचे नाहीत, परत असा प्रश्न विचारशील तर खबरदार. गप्प बस, मी नाही तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार तुला काय हवं ते कर.' असं रामदेवबाबा यांनी पेट्रोल-डिझेलबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला ठणकावून सांगितलं. काँग्रेसचे नेते इमरान प्रतापगढी यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. तसंच रामदेवबाबा चिडल्याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होतो आहे.

एका पत्रकाराने रामदेवबाबांना त्यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत प्रश्न विचारला. आपल्या आधीच्या एका वक्तव्यात रामदेवबाबा म्हणाले होते की जनतेला अशा सरकारचा विचार केला पाहिजे जे सरकार पेट्रोलची किंमत ४० रूपये प्रति लिटरवर आणू शकेल आणि ३०० रूपयांमध्ये घरगुती गॅस उपलब्ध करून देईल. रामदेवबाबांचं हे वक्तव्य त्यावेळी खूप गाजलं होतं. त्याचाच संदर्भ देत सध्या वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरांबाबत पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. ज्यानंतर रामदेवबाबा चांगलेच भडकले.

मी त्यावेळी तसं बोललो होतो, आत्ता मला तुझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर द्यायचं नाही, मला प्रश्न विचारू नकोस गप्प बस, मी उत्तर देणार नाही तुला काय करायचं ते तू कर असं रामदेवबाबा या पत्रकाराला म्हणाले आहेत. मी काय ठेकेदार नाही की तुम्ही जे काही प्रश्न विचाराल त्याचं उत्तर देत फिरू. रामदेवबाबांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काँग्रेस नेते इमरान प्रतापगढी यांनी इंधन दरांवर विचारलेल्या प्रश्नांवर पत्रकाराला धमकी देणारे व्यापारी रामदेव अशी कॅप्शन देऊन हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ अनेकांनी रिट्विटही केला आहे. तसंच हा व्हीडिओ आत्तापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या घटनेवरून अनेक लोक रामदेवबाबांना नावंही ठेवत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in