बांगलादेश लष्कराच्या १२२ सैनिकांनी दिल्लीतील राजपथावर भारतीय जवानांच्या बरोबरीने प्रजासत्ताकदिनी पहिल्यांदाच संचलन केलं. यंदा बांगलादेश मुक्तिसंग्रामाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वतंत्र बांगलादेशच्या लढाईत भारतीय लष्कराच्या जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी हा सहभाग दर्शवला. बांगलादेशच्या लष्कराचे कर्नल मोहताशिम हैदर चौधरी यांनी या पथकाचं नेतृत्व केलं.
२६ वर्षे लष्करी सेवा देणाऱ्या कर्नल चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राजपथाच्या संचलनात यंदा दोन पथके सहभागी झाली असून, त्यातील एक संचलन होते, तर एक बँड पथक होते. लष्करी संचलन पथकामध्ये तिन्ही दलाचे सैनिक सहभागी झाले, त्यात हवाई लेफ्टनंट, नौदल लेफ्टनंट, मेजर आणि तीन लेफ्टनंट कर्नल यांचा समावेश होता.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये बाहेरील देशांच्या पथकाने सहभागी होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१६च्या संचलनामध्ये फ्रान्स, तर २०१७च्या संचलनात ‘यूएई’चे पथक सहभागी झाले होते.