बीड: ‘तुझा बाप कर्जबाजारी झाला’, सासरी असलेल्या मुलीला फोन करत शेतकऱ्याची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड: ‘गिताजंली तुझा बाप कर्जबाजारी झाला आहे. घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जीवन असहाय्य झाले आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतो.’ असं सासरी असणाऱ्या मुलीला फोनवरुन सांगून एका 42 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील चिंचोटी गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जबाजारीपणाला कंटाळून 42 वर्षीय शेतकऱ्याने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना बुधवार (15 डिसेंबर) पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेने चिंचोटी गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाळासाहेब लक्ष्मण गोंडे (वय 42 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून बीड जिल्ह्यातील चिंचोटी येथील ते रहिवाशी आहेत. त्याचं पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे अंदाजे दीड एकर शेती आहे. मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास बाळासाहेब हे शेतात वस्तीवर गेले होते.

बुधवारी सकाळी सहा वाजेच्याच सुमारास त्यांनी नादलगांव येथे राहणाऱ्या आपल्या मुलीला फोन केला. यावेळी त्यांनी मुलीला सांगितलं की, ‘गिताजंली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे. घेतलेले कर्ज फेडू शकत नाही. शेतात पीक देखील यंदा आलं नाही. संपूर्ण पीक वाया गेले आहे. यामूळे मी खूप खचून गेलो आहे. आता तू तिकडून लवकर निघ, मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे.’

ADVERTISEMENT

एवढंच बोलून बाळासाहेब यांनी फोन बंद केला. वडिलांचं असं बोलणं ऐकून घाबरलेल्या गिताजंली आपल्या चुलत भावाला फोन करुन सगळी हकीकत सांगितली आणि तुम्ही लवकर शेतात जाण्यास सांगितलं. यावेळी गितांजलीचा चुलत भाऊ कालीदास गोंडे यांनी काही अंतरावरच असलेल्या आपला पुतण्या युवराज दिलीप गोंडे याला फोन करुन बाळासाहेब यांच्या शेतात जा, तो आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

त्यामुळे युवराज गोंडे याने तात्काळ शेतात धाव घेतली. परंतु तोवर बाळासाहेब गोंडे यांनी दोरीच्या सहाय्याने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. युवराजने तात्काळ याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी याठिकाणी आणण्यात आला आहे.

मयत शेतकरी बाळासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक अविवाहित मुलगी व दोन विवाहित मुलीसह एक 10 वर्षाचा मुलगा असा एकूण परिवार आहे.

कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेल्याने बाळासाहेब गोंडे या शेतकऱ्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. या घटनेनंतर अवघ्या चिंचोटी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT