ठाकरे सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमधल्या विद्यार्थ्यांनी दिवसभर आंदोलन केलं. पुण्यात या आंदोलनाचा मोठा जोर पाहण्यास मिळाला. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते. या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून महाराष्ट्राशी संवाद साधला. MPSC ची परीक्षा काही महिन्यांसाठी नाही तर काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. उद्या MPSC परीक्षेची तारीख जाहीर होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा असंही आवाहन त्यांनी केलं.
“येत्या १४ मार्चलाच MPSC ची परीक्षा व्हावी हाच आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताची नाही”
गोपीचंद पडळकर, आमदार भाजप
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर पुण्यातलं आंदोलन मागे घेतलं जाईल असं वाटलं होतं. मात्र हे आंदोलन मागे घेण्यात आलं नाही. ज्यानंतर पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांची धरपकड केली.
“मी विद्यार्थ्यांसोबत आहे, हा विषय विद्यार्थ्यांचा आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून इथे हजारो विद्यार्थी आले आहेत. मी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. विद्यार्थी म्हणाले इथंच थांबायचं तर इथेच थांबणार आहे. येत्या १४ मार्चलाच MPSC ची परीक्षा व्हावी हाच आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताची नाही.” असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
MPSC च्या निर्णयामुळे राज्यातले विद्यार्थी सरकारविरोधात आक्रमक
आणखी काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
“कोणताही विद्यार्थी भडकेल असं वक्तव्य मी केलेलं नाही. मी पुण्यातल्या पत्रकार भवन येथील कार्यक्रमात आलो होतो. आमच्या कोकणातल्या कार्यकर्ता मित्राच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होतं. तिथे मला काही विद्यार्थी भेटले आणि त्यांनी MPSC ची परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी अहिल्यादेवी अभ्यासिकेत आलो आणि त्यानंतर आंदोलन सुरू केलं. या सगळ्या गोष्टींना राजकीय वळण लागण्याचं काहीही कारण नाही. जर सरकारला राजकारण वाटत असेल तर त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि १४ तारखेला ठरल्याप्रमाणे परीक्षा घ्यावी ” असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.