मुंबई: ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणसाठी बाहेर पडल्याने मुंबईतील लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईत उष्मा वाढू लागला आहे. पण याच उष्णतेच्या लाटा सहन करत ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आपला नंबर कधी येईल याची वाट पाहावी लागत आहे. मुंबईतील बीकेसी इथे देखील कोरोना प्रतिबंधक लसीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याबाबत ‘मुंबई तक’ने लसीकरण केंद्रवर आलेल्या काही नागरिकांशी संवाद साधला. पाहा नागरिकांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत.
वांद्रे येथील 65 वर्षीय रहिवासी विमला पांडे यांनी सांगितले की, त्या दोन तासांपासून प्रतीक्षा करीत आहेत. ‘मी मागील चार दिवसांपासून लसीकरणाच्या नोंदणीसाठी प्रयत्न करत होती. पण नोंदणी होऊ शकली नाही. इथे मी माझ्या पतीबरोबर आले आहे. आम्हाला तातडीच्या प्रवासासाठी लस आवश्यक आहे. आमचा नंबर केव्हा येईल याचीच वाट पाहत आहोत. लसीकरण केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की, आम्हाला समजत नाहीए की, आमचा नंबर कधी लागेल.”
अकबरी खान या 62 वर्षीय महिलेने सांगितले की, त्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आणि त्यासाठी त्यांना आज (2 मार्च) सकाळी 9 वाजेची वेळ देण्यात आली होती. ‘आम्ही दोन तासांपासून वाट पाहत आहोत. बराच वेळ रांगेत उभं राहणे शक्य नाही. आम्हाला माहित नाही की, आमचा नंबर केव्हा येईल.’
ही बातमी पाहिली का?: लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही विद्यार्थी का झाला पॉझिटिव्ह?
80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन ज्येष्ठ नागरिकांना घेऊन आलेल्या सलील देशपांडे म्हणाले की, ‘बर्याच प्रयत्नांनी आम्ही त्यांना दोन तासांनंतर लसीकरण केंद्रात पाठवू शकलो. लोकं सर्व बाजूने रांगा लावून उभे आहेत.’
दरम्यान, काही जणांनी पोलिसांचे कौतुक केले तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे. ‘माझे पालक नोंदणी करून लसीकरणासाठी आले. इथे काही प्रमाणात गर्दी होती पण पोलिसांनी परिस्थिती चांगली हाताळली. पण लोकांनी सुद्धा शिस्त पाळली पाहिजे.’
कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. पण अगदी नोंदणीपासून लस घेण्यापर्यंत नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.