पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. बंगालमध्ये २७ मार्चपासून ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्याची पुरेपूर तयारी केली आहे. यासाठी तृणमूलच्या अनेक नेत्यांना फोडत भाजपने ममता बॅनर्जी यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण केलंय. काही दिवसांपूर्वी भाजपच्या याच रणनितीचा एक भाग म्हणून टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
परंतू बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाबद्दल येणाऱ्या बातम्या या निराधार आहेत. “सौरव गांगुलीबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्यामध्ये काहीच तथ्य नाही. सौरव गांगुलीने अजून काहीही मत मांडलेलं नाही. जर त्याला पक्षात यायचं असेल तर आमच्यासाठी ते चांगलंच आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच आहे. परंतू सध्यातरी सौरवशी कोणतीही चर्चा सुरु नाहीये.” दिलीप घोष आज तक वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
सत्ता आली तर ६० रुपये दराने पेट्रोल देऊ, भाजप नेत्याचं आश्वासन
ममता बॅनर्जी यांना टक्कर देण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. यासाठी नंदीग्राम विधानसभा मतदार संघात ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदु असा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. काही दिवसांपूर्वी पॉलिटीकल स्ट्रॅटजिस्ट म्हणून काम पाहणाऱ्या प्रशांत किशोर यांनी भाजपने पश्चिम बंगालमध्ये १०० जागा जिंकल्यास राजकीय अंदाज वर्तवण सोडून देईन असं म्हटलं होतं. याला प्रत्युत्तर देताना घोष यांनी अशी वक्तव्य करणं हेच त्यांचं काम असून यासाठी त्यांना पैसे मिळत असल्याचं दिलीप घोष म्हणाले होते.