Income Tax ची नोटीस आल्याचं सांगितलं, दुसऱ्याच दिवशी संजय शिरसाटांचा Video आला समोर; क्रोनोलॉजी समजली का?
Sanjay Shirsat Video: संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. जाणून घ्या या सगळ्या मागे नेमकं काय राजकारण आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत संजय शिरसाट एका खोलीत बनियनवर बसलेले दिसत आहे. यावेळी ते बेडवर बसून सिगारेट ओढत आहेत. तर त्यांच्या शेजारी पैशांनी भरलेली बॅग असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ आणि संजय राऊत यांचे आरोप
संजय राऊत यांनी आज (11 जुलै) सकाळी ट्विटरवर (X) हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केले. राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिले, "हा रोमांचक व्हिडिओ आदरणीय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाहावा! देशात नक्की काय चाललंय? (महाराष्ट्रातील मंत्र्यांचा हा व्हिडिओ बरंच काही सांगतो)."
हे ही वाचा>> 'श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस', शिरसाट बोलून गेले... अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला.. तुम्हाला क्रोनोलॉजी समजली का?
त्यांनी पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस!," असं म्हटलं आहे. राऊत यांनी या व्हिडिओद्वारे शिंदे गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून, यामुळे महायुती सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
'त्या' Video मध्ये नेमकं आहे तरी काय?
या 34 सेकंदांच्या व्हिडिओत शिरसाट एका बेडवर सिगारेट ओढत फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यांच्या शेजारील बॅगेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.










