
दिल्ली : अनेक दिवसांपासून रखडलेल्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी या निवडणुकीची अधिसुचना निघणार आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. तर मतदान आणि मतमोजणीची वेळ आल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.
त्यामुळे 24 ऑक्टोबरच्या दिवाळीपूर्वीच काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. दरम्यान, नव्या अध्यक्षांची पहिलीच परिक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या गुजरातमध्ये आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हिमाचल प्रदेशमध्ये असणार आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इथे विधानसभा निवडणूक होणार आहे. माध्यमांमधील चर्चांनुसार अध्यक्षपदासाठी सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव चर्चेत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मानहानीरकारक पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यानंतर पक्षामधून सातत्याने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी करण्यात येत होती. गतवर्षी ऑक्टोंबर महिन्यात पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती.
अखेरीस आज (रविवारी) काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदाची निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी सध्या वैद्यकीय उपचारासाठी परदेशामध्ये आहेत. मात्र त्यांनीही या बैठकीत ऑनलाईन सहभाग नोंदवला. त्यांच्यासह प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनीही ऑनलाईन सहभाग नोंदविला.