Sangli Crime News :
सांगली : जतमध्ये भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकाची भरदिवसा गाडी अडवत गोळ्या घालून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड (Vijay Tad) असं मृत माजी नगरसेवकाचे नाव आहे. जत शहरातील सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ ही घटना घडली आहे. भररस्त्यात घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (former BJP corporator Vijay Tad was shot and killed in jath, Sangli)
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जत नगरपालिकेतील माजी भाजप नगरसेवक विजय ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील शाळेत आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचताच त्यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताड यांची इनोवा गाडी अडवली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर डोक्यात दगडही घातला.
या घटनेमुळे जत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला का आणि कोणी केला आहे हे मात्र समजू शकलेलं नाही. घडलेली घटना शहर आणि आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी विजय ताड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. तसेच कुटुंबीयांनीही धाव घेऊन ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
आशिष शेलार-भास्कर जाधवांमध्ये शाब्दिक चकमक, नार्वेकर म्हणाले…
दरम्यान, घटना समजताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. याशिवाय घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली हेही तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.