गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडीत रवानगी; १०९ जणांना न्यायालयीन कोठडी
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्लाप्रकरणात मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात अटक केलेल्या इतर १०९ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (८ एप्रिल) संपकरी […]
ADVERTISEMENT

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्लाप्रकरणात मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात अटक केलेल्या इतर १०९ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (८ एप्रिल) संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. अचानक सिल्व्हर ओक येथे धडकलेल्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चपला भिरकावल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.
न्यायालयात काय घडलं?
मुंबई पोलिसांनी आज सदावर्तेंसह इतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने, तर महेश वासवानी यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी सुरुवातीलाच गुणरत्न सदावर्ते कालच अटक केली असून, १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. “गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांना चिथावणी दिली. आम्ही शरद पवारांच्या घरात घुसून जबाब विचारू असं सदावर्त म्हणाले होते,” असं वकिलांनी न्यायालयात सांगितलं.