कर्नाटकच्या महाविद्यालयामध्ये हिजाबवरून जो काही वाद सुरू आहे त्या वादावर देशभरात आंदोलनं सुरू झाली आहेत. या प्रकरणावरून महाराष्ट्राताही काही ठिकाणी हिजाब घालण्याचं समर्थन केलं जातं आहे आणि आंदोलनं करण्यात येत आहेत. अशात मुंबईतल्या एका महाविद्यालयात हिजाब, स्कार्फ, घुंगट याला बंदी घालण्यात आली आहे अशी बातमी समोर आली होती. काही माध्यमांनी ही बातमी प्रसारित केली. मात्र यामागचं सत्य काय आहे ते मुंबई तकने शोधून काढलं आहे.
माध्यमांनी काय बातम्या दिल्या होत्या?
‘मुंबईतल्या माटुंगा भागात असलेल्या एम. एम. पी. शाह कॉलेजमध्ये हिजाब, बुरखा आणि घुंगट यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकचे पडसाद मुंबईतही उमटले आहेत. ‘ या बातमीसाठी कॉलेजच्या वेबसाईटवर असेल्या नियमावलीचा आधार घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या कॉलेजमध्ये कोणतीही हिजाब, बुरखा किंवा घुंगट बंदी नाही. मुंबई तकशी बोलताना कॉलेजच्या प्राचार्य लीना राजे यांनी हे सांगितलं आहे.
काय म्हणाल्या प्राचार्य लीना राजे?
‘आमच्या वेबसाईटवर जी नियमावली आहे त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्येही हे लिहिलं आहे. याचं एक महत्त्वाचं कारण आहे. काही काळापूर्वी काही तरूण मुलं हिजाब घालून कॉलेजमध्ये येत होते. पूर्ण हिजाब घालून यायचे आणि मुलींना त्रास द्यायचे. या सगळ्या घटना वाढल्यानंतर आम्हाला हा नियम करावा लागला. आमच्या कॉलेजमध्ये कुठल्याही मुलीला हिजाब घालून येण्यापासून रोखण्यात येत नाही. तुम्ही कॉलेजच्या आवारात थांबून पाहूही शकता. आमच्या महाविद्यालयात जवळपास 50 टक्के विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत. तुम्ही त्यांनाही विचारू शकता की तुम्हाला अडवलं जातं का? ‘
‘आमच्या महाविद्यालयातल्या काही प्राध्यापिकाही मुस्लिम आहेत. आम्ही त्यांनाही हिजाब घालण्यापासून रोखलेलं नाही. मागच्या काळात जे काही प्रसंग घडले तसा अनुभव पुन्हा कुणालाही येऊ नये इतकाच आमचा या मागचा उद्देश आहे. म्हणून आम्ही तो नियम लिहिला आहे. ही घटना कर्नाटकच्या प्रकरणाशी जोडून त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो आहे. आम्ही वर्ग सुरू असताना हिजाब काढण्यास सांगतो जेणेकरून मागच्यावेळी झाले ते होऊ नयेत. आमच्या वेबसाईटवर आणि नियमावलीत लिहिलेल्या नियमाचा पूर्णपणे चुकीचा अर्थ काढला गेला आहे.’