महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता राज्य सरकारने काही महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध कडक करत संचारबंदी लागू केली आहे. अमरावती, अकोला यासारख्या भागांमध्ये ८ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणाही करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच पुन्हा लॉकडाउन लावायचं की नाही याबद्दल आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते.
यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागतं की काय अशा चर्चा सामान्य जनतेमध्ये सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पुन्हा लॉकडाउन लागणार नाही पण नागरिकांनी निर्बंध पाळणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. “लॉकडाउनच्या नावाखाली काहीजण साठेबाजार आणि शेतमालाचे भाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या भागात डाळिंबासह, द्राक्षाचं पिक घेतलं जातं. लॉकडाउन लागेल या भीतीने शेतकरी १०० रुपयांची वस्तू ७० रुपयांना विकून मोकळे होतायत. त्यामुळे जनतेने घाबरुन जाण्याची गरज नाहीये, फक्त नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.” दत्तात्रेय भरणे इंदापुरात आयोजित बैठकीत बोलत होते.
इंदापुरात वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरणे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भरणे यांनी लॉकडाउन व वाढत्या रुग्णसंख्येबद्दल भाष्य केलं.
अवश्य वाचा – धक्कादायक ! तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू