मराठी भाषा दिवस आल्यानंतरच अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्याविषयी या सरकारला जाग येते का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. आज राज ठाकरे यांनी मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेला मुंबईत सुरूवात केली. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ही व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना सत्तेत आहेच, मग मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या गोष्टी फक्त मराठी भाषा दिवस आल्यावर आठवतात का? हा काही संभाजी नगर सारखा विषय करायचा आहे का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
आणखी काय म्हणाले राज ठाकरे?
शिवजयंती आणि मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारता मग सरकारमधील मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे कार्यक्रम आणि रॅली कशा चालतात? असं म्हणत राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच कोरोना इतका वाढला असले तर मग गर्दी टाळण्यासाठी निवडणुका का पुढे ढकलत नाही? एक वर्षभराने निवडणुका घ्या काही फरक पडत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच तुम्ही मास्क का लावला नाही असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला तेव्हा मी मास्क लावतच नाही असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. मंत्री गर्दी करत आहेत, धुडगूस घालत आहेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देतं. कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल तर निवडणुकाही पुढे ढकला असंही म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
मनसेची स्वाक्षरीची मोहीम पहिल्यांदा होत नाहीये फक्त यावेळी मी ती मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवलं. माझी मराठीजनांना विनंती आहे की आपली स्वाक्षरी मराठीतून करा. मराठीतून काहीतरी करतो आहोत हे कायम मनात राहतं. मी सगळीकडे मराठीत सही करतो. प्रत्येक वेळी नुसती आसवं गाळून काय होणार? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.