मुंबईचे माजी मोदी सरकारने मदत केली आहे असा आरोप आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मोदी सरकारच्या आशीर्वादाने परमबीर सिंग परदेशात पळून गेले. ज्या दिवशी अनिल देशमुख यांना अटक केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी परमबीर सिंग यांच्या वकिलांच्या मार्फत कोर्टात प्रतिज्ञापत्र देण्यात आलं आणि त्यात हे सांगण्यात आलं की आमच्याकडे अनिल देशमुखांच्या विरोधात काहीही पुरावे नाहीत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोडलं तर त्यांच्याकडे आरोप सिद्ध करायला काहीही नाही. त्यामुळेच मोदी सरकारने त्यांना पळून जाण्यास मदत केली असा आरोप आता नाना पटोलेंनी केला आहे.
खोटे आरोप लावायचे आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हा भाजपचा डाव आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. जर मोदी सरकारला लोकांना जेलमध्ये पाठवण्याची हौस असेल तर आता आम्ही सगळे काँग्रेसवाले तुरूंगात जायला तयार आहोत असंही प्रतिपादन नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं.
अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग यांच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत, जाणून घ्या कसं समोर आलं वास्तव?
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. 20 मार्चला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी हा उल्लेख केला होता की अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या यामध्ये ढवळाढवळ करतात आणि त्यांनी सचिन वाझेला मुंबईतील बार आणि रेरस्तराँमधून दर महिन्याला १०० कोटी रूपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं. हे सगळं प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता.
अनिल देशमुख हे अटक टाळण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. परमबीर सिंग हे ऑगस्ट महिन्यानंतर समोर आलेले नाहीत. तसंच अनिल देशमुखही समोर आले नव्हते. अनिल देशमुख हे 1 नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर झाले. तिथे सहा तास चौकशी झाल्यानंतर त्यांना उशिरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी परमबीर सिंग यांच्यातर्फे एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं की त्यांच्याकडे अनिल देशमुखांविरोधात काही पुरावे नाहीत.
महागाई, बेरोजगारी, गरीबी या प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये, लोकांचं लक्ष दुसरीकडे लागलं जावं म्हणून हे खोटे आरोप लावले जात आहेत. आम्ही आमची लढाई आता कोर्टात नेली आहे. कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आता प्रश्न विचारणार आहोत असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. किरीट सोमय्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले. त्यातला एक आरोप तरी सिद्ध झाला का?
ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही तिथे मंत्र्यांना, राजकारण्यांना वेठीस धरलं जातं आहे. भुजबळांचं उदाहरण आमच्यासमोर आहे. अडीच वर्षे त्यांना तुरुंगात डांबलं जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. त्यामुळे आरोप करायचे आणि महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे असं दाखवण्याचा भाजपचा सातत्याचा प्रय़त्न आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेनेही ओळखलं आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.