कोरोनाविरोधी लढ्यात मुंबईकर झाले 'बाहुबली'! BMC च्या लसीकरण मोहिमेनं गाठला महत्त्वाचा टप्पा

कोरोना लसीच्या पहिल्या डोसचं १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण
कोरोनाविरोधी लढ्यात मुंबईकर झाले 'बाहुबली'! BMC च्या लसीकरण मोहिमेनं गाठला महत्त्वाचा टप्पा
(फोटो सौजन्य - PTI)

कोरोनाविरुद्ध लढाईत मुंबई शहराने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबईत शहरात आज ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्याचं लक्ष्य साध्य झालं आहे. मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी साध्य करण्यात आली. त्यापाठोपाठ पहिल्या मात्रेचे लक्षांक गाठून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे.

यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे.

जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करावयाचे आहे. पैकी आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिली मात्रा घेतल्याची नोंद कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेत स्थळावर झाली आहे. म्हणजेच पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे.

सर्व संबंधित पात्र नागरिकांनी कोविड लसीची दुसरी मात्रा देखील घेवून लसीकरण पूर्ण करावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा आणि जनजागृती करण्यात येत आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुमारे ५९ लाख ८३ हजार ४५२ मुंबईकर नागरिकांनी दुसरी मात्रा देखील घेतल्याची नोंद झाली आहे. पहिल्या मात्रेचे लक्षांक पूर्ण झाल्याने आता दुसऱ्या मात्रेचे लक्षांक देखील लवकरात लवकर गाठण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, असे विनम्र आवाहन या निमित्ताने महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in