नाशिक (प्रविण ठाकरे) : येथील जिंदाल ग्रुप कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जखमींंची विचारपूस केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी मृतांच्या वारसांना शासनाच्या वतीने पाच लाखांची मदतही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली. तसंच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव जवळील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी एक स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील बॉयलर फुटल्याने लाग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, नॅशनल हायवे यांची अग्निशामक दलाचे जवान आणि बंब घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आग दुर्घटनेत दोघांचा मृत्यू :
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या महिमा (२०) आणि अंजली (२७) या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयात एकूण ४ रूग्ण गंभीर अवस्थेत दाखल झाले होते. त्यात २ मुली आणि २ मुले होती. मात्र महिमा आणि अंजली यांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. एका मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर, दुसऱ्या मुलीचा दुखापतीमुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. जालीम कुमार प्रजापती आणि लवकुश कुशवाह या दोघांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
सोलापूरमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत मोठा स्फोट; २ जण मृत्यूमुखी :
नाशिकमधील इगतपुरी येथील जिंदाल ग्रुप कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना ताजी आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आगीची आणखी एक दुर्घटना घडली आहे. बार्शीमधील पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. यात २ जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.