
अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे. 2017 मध्ये ती भूमिका केली होती. ती भूमिका आपण का स्वीकारली? याबाबत अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र तरीही भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंना पाठिंबा दिला आहे. तसंच भाजपवरही खोचक शब्दात टीका केली आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
'गांधी' हा सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. विशेष म्हणजे कोल्हे यांच्या या चित्रपटाचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असं ते म्हणाले. एवढंच नाही तर भाजप टीका करतं आहे. भाजपचे लोक गांधीवादी कधीपासून झाले? असा खोचक प्रश्नही शरद पवारांनी विचारला आहे.
आणखी काय म्हणाले शरद पवार?
ज्यावेळी नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हे यांनी केली त्यावेळी ते आमच्या पक्षात नव्हते. भाजपने टीका केली असे कळतंय भाजप कधी गांधीवादी झाले हा प्रश्न आहे.कलाकार म्हणून कोणत्याही कलाकाराचा मी सन्मान करतो. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
अमोल कोल्हे यांनी या सगळ्या वादावर काय स्पष्टीकरण दिलं आहे?
2009 नंतर राजा शिव तोडीची भूमिका करण्यासाठी मी जवळपास आठ वर्षे प्रयत्न करत होतो. कलाकार म्हणून ती माझी एक गरज होती. त्यामुळे पुढे काय? हा माझ्यापुढे प्रश्न होता. त्याचवेळी माझ्यासमोर why i killed gandhi या हिंदी सिनेमाची ऑफर आली. हिंदीतला प्लॅटफॉर्म मिळणं ही मला मोठी गोष्ट वाटली. त्यांनी मला जेव्हा सांगितलं की मला नथुराम साकारायचा आहे तेव्हा माझ्या मनात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. दिग्दर्शक अशोक त्यागी यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी मला हे सांगितलं की जी कोर्ट ट्रायल झाली त्यात नथुरामने जी भूमिका मांडली ती तुम्हाला करायची आहे. त्यांना त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की नथुरामचं उदात्तीकरण होईल अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करणं हे धादांत न पटणारी गोष्ट आहे. कारण कोणत्याच हत्येचं समर्थन होऊ शकत नाही. त्यांनी मला तेव्हा सांगितलं की तुम्ही फक्त ही भूमिका एक कलाकार म्हणून साकारत आहात.'
'त्यांनी मला हे सांगितल्यानंतर मी विचार केला की अनेकदा वैचारिक भूमिका वेगळी असतानाही कलाकार विविध भूमिका साकारत असतात. रावणाचीही भूमिका केली जाते, कंसाचीही भूमिका केली जाते, गँगस्टरचीही भूमिका केली जाते. याचा अर्थ तो कलाकार त्या विचारधारेशी सहमत असतो का? तर तसं नाही. त्यामुळे एखादी भूमिका साकारली म्हणजे त्या विचारधारेचा शिक्का कुणा कलाकारावर मारला जावा हे योग्य नाही. निळू फुले, प्रभाकर पणशीकर यांनी अनेक खलनायक अजरामर करून ठेवले आहेत. विचारधारा पटत नसतानाही त्यांनी य़ा भूमिका साकारली. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात काही वाद झाले आणि हा सिनेमा रिलिज होणार नाही असं मला तेव्हा कळलं होतं.'
'या सगळ्यानंतर परवाच्या दिवशी मला समजलं की why i killed gandhi हा सिनेमा बहुतेक रिलिज होतो आहे. त्यानंतर काल माध्यमांमध्ये याच्या बातम्या आल्या. त्याचा संबंध मी राष्ट्रवादी काँग्रेसचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतो आहे त्याच्याशी जोडण्यात आला. मात्र 2017 मध्ये कलाकार अमोल कोल्हेनी भूमिका स्वीकारली तेव्हा सगळी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मला स्वप्नातही माहित नव्हतं की मी 2019 ला खासदारकीची निवडणूक लढवणार आहे. आज अचानक हा वाद उद्भवला आहे.'