Omicron: ...तर पुन्हा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो: आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

Omicron: ...तर पुन्हा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो: आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
omicron variant if corona patients increase lockdown can be imposed again minister of state for health bharti pawar

स्वाती चिखलीकर, सांगली: 'ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशातील कोरोनाचे संकट गहिरं झालं आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत अधिक वाढ झाल्यास संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.' असा इशाराच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला आहे. सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

'गरज पडल्यास लॉकडाऊनचा निर्णय'

'ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटपेक्षा झपाट्याने होत असल्याचं दिसून आलं आहे. पणं असं असलं तरी तो बरा देखील लवकर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.' असं भारती पवार म्हणाल्या.

'केंद्र सरकारने राज्य सरकारांना दोन पॅकेजमधून विशेष मदत केली आहे. पॅकेजचा निधी देखील वितरित करण्यात आला आहे. यामधून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध खरेदी करता येतील.' अस सांगून पवार पुढे म्हणाल्या, 'लॉकडाऊनचा निर्णय हा सर्वस्वी राज्य सरकारचा आहे. कंटेन्मेंट झोन करणे, कडक नियम लावणे हे सर्व काम राज्य सरकारनी करायचे आहे. रुग्णसंख्या वाढल्याने गरज पडल्यास लॉकडाऊनचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यायचा आहे.' असंही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने महाराष्ट्रात कोरोनासंदर्भातले निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 25 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सगळ्यांनी आरोग्याचे नियम पाळावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

युरोप तसेच युकेमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील 110 देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

नाइट कर्फ्यू लागू

  • संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी.

  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in