दिल्लीत प्रदुषणाचा कहर! एक आठवड्यासाठी शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीत प्रदुषणामुळे कहर माजला आहे. वातावरणात जो प्रदुषणाचा थर पसरला आहे त्यामुळे दिल्ली सरकारने शाळांना एक आठवड्याची सुट्टी जाहीर केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातली घोषणा केली. सोमवारपासून म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून एक आठवडा शाळा बंद राहणार आहेत. तर सरकारी कर्मचारी सोमवारपासून एक आठवड्यासाठी वर्क फ्रॉम होम करणार आहेत असंही जाहीर करण्यात आलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी 14 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत दिल्लीत होणाऱ्या बांधकामांच्या कामांनाही स्थगिती देण्याचं ठरवलं आहे. कंस्ट्रक्शन म्हणजेच बांधकामाशी संबंधित कोणतीही कामं या कालावधीत केली जाणार नाहीत असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आज अरविंद केजरीवाल यांनी एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत प्रदूषण वाढलं आहे त्यामुळे त्याचा परिणाम शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून त्यांना एक आठवड्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत शाळा ऑनलाईन वर्ग घेऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं आहे. दिल्लीतल्या प्रदुषणाविषयी सुप्रीम कोर्टानेही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची एक तातडीची बैठक बोलावली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या बैठकीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, पर्यावरण मंत्री गोपाल राय, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि दिल्लीचे मुख्य सचिवही हजर होते.

कोरोना संकटात दिल्लीत प्रदुषणाची पातळी वाढली आहे. दिल्लीत काल हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 462 इतका नोंदवला गेला. हाच निर्देशांक आज 550 इतका होण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत प्रदूषणाची पातळी आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होतेय. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक सहाशेपार जाण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी इथले नागरिक करतायत. त्यातच पंजाब, हरयाणात पराली जाळल्याने प्रदूषणाचा धोका वाढत असल्याचं बोललं जातंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT