सध्या महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. देशात 2020 पासून कोरोना व्हायरसने थैमान घातलं होतं. अजूनही देशावरील कोरोनाचं संकट हे संपूर्णपणे टळलेलं नाही. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येते. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सतत करण्यात येतंय. तर अजूनही लोकांच्या मनात कोरोना व्हायरससंदर्भात प्रश्न कायम आहेत.
महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..
कोरोनाची व्हायरसची प्रमुख लक्षणं (Corona Virus Symptoms)
शरीराचं तापमान 37.8C म्हणजेच 100.4F पेक्षा जास्त असेल तर हे कोरोनाचं लक्षण असल्याची शक्यता आहे.
जर तोंडाची चव संपूर्णपणे जात असेल किंवा कोणत्याही गोष्टींचा वास येत नसेल तर हे देखील कोरोनाचं लक्षण असल्याची शक्यता आहे.
कोरोनाचा खोकला हा न थांबणारा खोकला असतो. यामध्ये 24 तासांमध्ये 3 किंवा जास्त वेळा सलग खोकला सुरू असतो. दरम्यान श्वास घेण्यास त्रास होणं हे देखील कोरोनाचं प्रमुख आणि गंभीर लक्षण मानलं जातं.
कोरोना व्हायरसवर करण्यात येणारे उपाय
सध्या संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. कोरोना लस हे कोरोना व्हायरसवरील एक उपाय आहे. तर कोरोनावरील दुसरा उपाय आहे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवणं. यामध्ये योग्य आहार, व्यायाम, योगा तसंच मानसिक आरोग्य या गोष्टींमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कोरोना अपडेट: महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद?
कोरोनाचा नवा स्ट्रेन
संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. त्याचप्रमाणे युरोपमधील काही देशांनी कोरोनाची नवीन आणि अधिक संसर्गजन्य प्रजाती आढळून आल्याचं सांगितलं होतं. नवीन प्रकारच्या या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून हा विषाणू 70 टक्के अधिक वेगाने पसरत असल्याचं निती आयोगाच्या सदस्यांनी सांगितलं होतं. या नव्या स्ट्रेनला ‘सुपर स्प्रेडर’ असंही म्हटलं होतं.
दरम्यान प्रत्येक विषाणू हा स्वतःमध्ये बदल करतो. विषाणूच्या या बदलाला म्युटेशन असं म्हणलं जातं. विषाणू म्युटेट होतो म्हणजेच स्वतःच्या संरचनेत काही बदल करून नवीन प्रकाराच्या विषाणूत रुपांतरीत होतो. या सर्व प्रक्रियेला विषाणूचा नवा स्ट्रेन असं म्हणतात.
भारतात आता २४ तास घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस-डॉ. हर्षवर्धन
कोरोनापासून बचाव
कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणं. यामध्ये साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा देखील तुम्ही वापर करू शकता. यामुळे हातावर असलेले विषाणू निष्क्रिय होण्यास मदत होते.
तुमच्या हाताचा डोळ्यांना, नाकाला तसंच तोंडाला स्पर्श करणं टाळा. आपल्या हाताचा स्पर्श अनेक ठिकाणी होतो आणि यामुळे हाताला विषाणू चिकटण्याची शक्यता असते. अशावेळी जर तुमच्या हाताचा डोळ्यांना, नाकाला किंवा चेहऱ्याला स्पर्श झाला तर विषाणू तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता वाढते.