आधी कुटुंबाला सांगा मुंबई महापालिकेत जाऊ नका; राज ठाकरे कडाडले! भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची विराट सभा आज शिवाजी पार्कवर झाली. या सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते शरद पवारांपर्यंत राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला. जातीपातीच्या राजकारणापासून ते मशिदींवरील भोंग्यापर्यंत राज ठाकरे यांनी मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर मुंबईतील बकाल अवस्थेवरूनही शिवसेनेवर निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले…

“लॉकडाऊन सगळ्यांच्या विस्मरणात गेला. ते चांगलंच आहे, पण लॉकडाऊन बरोबरच अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. म्हणून मी फ्लॅश बॅक देऊ असा विचार केला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनाही आपण विसरून गेलो आहोत. २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. माध्यमे दररोज नवनवीन बातम्या देतात आणि तुम्हाला विसरायला होतं. ते तुम्ही विसरता हेच त्यांच्या फायद्याचं आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“२०१९ मधील विधानसभेची निवडणूक आठवा. भाजप-शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की, अडीच अडीच वर्षाचं ठरलं होतं. आम्हाला तर तुम्ही कधी बोलला नाहीत. सभा घेतल्या, त्यावेळी तुम्ही सांगितलं नाही. मोदींनी सांगितलं भाजपचा मुख्यमंत्री होईल. अमित शाह हेही हेच बोलले, पण तुम्ही काहीही बोलले नाही.”

“निकाल लागल्यानंतर सरकार अडकतंय तेव्हा अडीच वर्षाचा मुद्दा काढला. अमित शाहांसोबत एकांतात बोललात मग बाहेर का बोलला नाहीत. अमित शाह सांगताहेत आमचं असं बोलणं झालेलं नाही. एक दिवस आपण सकाळी उठलो आणि पाहतो, तर काय जोडा वेगळाच. पळून कुणाबरोबर गेली. लग्न कुणाबरोबर काहीच कळेना… मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो… महाराष्ट्राला समजेना कुणाला मतदान केलंय. मग आवाज आला की ये शादी नहीं हो सकती. फिस्कटलं.”

“हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरीतून कुणीतरी डोळा मारतंय. याचं वेगळंच काहीतरी सुरू. मला कडेवर घ्या म्हणून… मला कळत नाही. एक नंबरचा पक्ष भाजप. दोन नंबरचा पक्ष शिवसेना, तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस… तीन नंबरचा पक्ष एक नंबर आणि दोन नंबरला फिरवतोय. महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणा असा प्रकार बघितला नाही.”

ADVERTISEMENT

“व्यासपीठावरून तुम्ही एकमेकांना शिव्या घालता आणि नंतर मांडीला मांडी लावून बसता. हे तुमचं झेंगाट आहे. आमच्याशी काय संबंध. मतदारांनी तुम्हाला मतदान युतीसाठी केलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यासाठी मतदान केलं नव्हतं. पण यासाठी शासन कोण करणार. पण होतं काय आम्ही विसरून जातो.”

ADVERTISEMENT

“गुलाम आहात का त्यांचे. याचसाठी मतदान करता का. कुणीही तुम्हाला फरफटत नेतं आणि तुम्ही जाता. तुम्ही हे सगळं विसरून जाता. सकाळी कॅमेरेवाले आले की पकपक सुरू… तुम्हाला आठवत असेल, माझी पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी मी सांगितलं होतं की वाझे शिवसेनेत होता. तो माणूस एका गाडीत जिलेटीन ठेवतो. ती गाडी सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर लावतो. हे सहज झालं का. तेव्हा मी तुम्हाला होतो की, याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही.”

“आज कुणीच त्या विषयाबद्दल बोलत नाही. देशातील मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटकाची गाडी सापडते. त्याचं उत्तर अजून मिळत नाही. एक अधिकारी तुरुंगात जातो. नंतर आयुक्तांना काढलं जातं आयुक्त म्हणतो की गृहमंत्र्यांनी १०० कोटी मागितले. गृहमंत्री तुरुंगात जातो. हे आठवतं का तुम्हाला हे. परत निवडणुका होणार… आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. याचाच फायदा घेतला जातो. नवीन काहीतर टूम काढायची.”

“दाऊदशी संबंध असल्याच्या प्रकरणात नवाब मलिक तुरुंगात आहे. याच शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. राष्ट्रवादीच काँग्रेसचा पहिले मंत्री कोण होते छगन भुजबळ. ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते. पण ते हे सगळं तुमच्या नाकावर टिच्चून करतात. तुम्ही रांगेत उभे राहून मतदान करायचं आम्ही वाटेल ते करू. गृहमंत्री तुरुंगात गेला काही फरक पडत नाही. काय करणार आहात तुम्ही.”

“नवाब मलिक तुरुंगात गेले. हिंमत बघा त्यांची. गाडीतून जाताना तुम्हाला अंगठा दाखवतात. हे सगळं तुम्हाला मेंढरासारखं वापरत आहे. बरेच विषय काढून ठेवलेत. का मी भाषण करतो कळत नाही. तुम्ही का येता, काही कळत नाही. सगळे विसरुन जातील.”

“लोकशाही कशी असते हे इंग्लंडमध्ये बघा. विन्स्टन चर्चिल यांनी दुसरं महायुद्ध जिंकून दिलं. आठ महिन्यांनी तिथे निवडणूका झाल्या, त्यावेळी चर्चिल पराभूत झाले. पत्रकारांनी तिथल्या माणसांना विचारलं की, ज्याने युद्ध जिंकून दिलं. त्यांना पराभूत केलं. ते म्हणाले, युद्धकाळात चांगले होते, शांततेच्या काळात नाही. ही समज लागते. प्रल्गभ समाज असा असतो. कितीही लाथा मारल्या तरी त्यांच्यामागे जाणार असा समाज नसतो. त्यामुळे महाराष्ट्र, देशाची ही अवस्था आहे.”

“महाराष्ट्राची परंपरा आपण विसरून गेलो. जो जो व्यक्ती इतिहास विसलाय, त्याचा पायाखालची जमीन सरकलीये. आमचा गृहमंत्री तुरुंगात जातो. आमचा एक मंत्री अतिरेकी माणसाशी संबंध आहे म्हणून तुरुंगात जातो. हे कुठे सुरूये तर महाराष्ट्रात. शिवछत्रपती हे काय डेकोरेशन नाही. हा विचार पुढे घेऊन जायचा असेल, तर अशी माणसं चालणार नाही.”

“शिवाजी महाराजांनी सुभेदाराला लिहिलेल्या पत्रातील एका ओळीत शासन कसं असावं हे लिहिलंय. आज महाराष्ट्र काय आहे. सगळीकडे बोंबाबोंब. एसटी कर्मचारी संप. शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य महाराष्ट्रातील माणसांना मिळालं पाहिजे.”

“मी २०१४ मध्ये म्हणालो होतो की, तीन राज्यांत विकास करा. तिथून लोक बाहेर पडताहेत. आज उत्तर प्रदेशात विकास होतोय. सगळ्यांचं ओझ घ्यायला महाराष्ट्र बसलेला नाही. वर्तमानपत्रातील ओळी वाचतात. त्या ओळींमधलं वाचत नाही. सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असेल, तर त्यांच्याकडे उत्तम हत्यार आहे, ते म्हणजे जातीचं.”

“आयोध्येला जाणार आहात की नाही जाणार आहात… जाणार. आता तारीख सांगत नाही. जातीपातीमध्ये गुंतून पडणार असू, तर कुठलं हिंदुत्व घेऊन बसलोय आपण. हिंदू हा हिंदू-मुस्लिम दंगलीत हिंदू होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही की, आपण कोण आहोत. तो ज्यावेळी मराठी होतो, त्यावेळी तो पंजाबी, तामिळी, गुजराती… ज्यावेळी तो मराठी होतो. त्यावेळी मराठा, ब्राह्मण, कोळी, आगरी… काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे.”

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण केला गेला. इथे बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. आम्ही इतिहास वाचतच नाहीये. ज्या शिवरायांनी एक व्हा असं सांगितलं. त्याच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. जातीतून बाहेर पडणार नाही, तर हिंदू कधी होणार.”

“अनिल शिदोरे उत्तर प्रदेशात गेले होते. ते एका ढाब्यावर थांबले होते, तिथे त्यांना विचारलं गेलं की कोणत्या जातीतील आहात. ही अवस्था करायची का महाराष्ट्राची. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जेम्स लेन आला. कोण आहे जेम्स लेन. बर्नाड शॉ आहे का? त्या भिकारड्याने जिजाऊसाहेबांबद्दल काहीतरी लिहिलंय, ते आपण उगाळतोय. त्यावरून जाणूनबुजून राजकारण तापवलं जातं.”

“आम्ही आमच्याच दैवतांची अब्रू काढतोय. कसलंच भान राहिलं नाहीये. निवडणुकीत पैशाचा चारा टाकला जातो. जातीपातीतून आम्ही बाहेर येत नाही आहोत. हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत. ही संपूर्ण विविधता… भाषा, संस्कृती, वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती. १९४७ मध्ये हा देश झाला. त्याआधी ही फक्त भूमी होती.”

“बाराशेच्या सुमारास गजनीचा मंहमद आला, त्यानंतर अल्लाउदुद्दीन खिलजी आला, त्यानंतर मोगलाचं आक्रमण झालं. आज जवळपास ८००-९०० वर्षानंतर मधला आपला मराठेशाहीचा इतिहास १२५ वर्षांचा… छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही अटकेपार झेंडे फडकावले. हा मधला काळ सोडला तर आपला देश पारतंत्र्यात होता. आपण आपली संस्कृती विसरलो का? आजही आपण त्याचं अभिमानाने आपल्या घराच्याबाहेर गुढी उभारतो. पोशाख, अन्न, संस्कार, भाषा तेच आहे.”

“प्रत्येक राज्याने आपाआपलं राज्य मोठं केलं, तर देशच मोठा होईल. आम्ही आमच्यातच ओरबाडणं सुरू केलंय. आमच्या लोकांकडे आमचं लक्ष नाही. शेतकरी आत्महत्यांमागे परकीय हात आहेत का? आमच्याच लोकांचा हात आहे ना? आज आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही. कुणाचा हात आहे आमच्याच लोकांचा, दळभद्री धोरणांचा विषय आहे ना? मला मतदारांचं कौतुक वाटतं. ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला सारलं आणि ज्यांनी काम केलं नाही, त्यांना सत्तेवर बसवलं.”

“नाशिकमध्ये जसं काम केलं तसं आधीही झालं नाही, नंतरही होणार नाही. कोण काम करेल तुमच्यासाठी. लफंगेगिरी करून सत्ता मिळवायची असेल, तर मग अपेक्षा करू नका. राज्य आहे. ही एक ताकद आहे. यातून आपण काय काय देऊ शकतो. रस्त्यावरून चालताना फुटपाथ नाही. गाडी चालवायची ट्रॉफिक आहे. मेट्रो आणली आपण पुड्या काढतोय. झोपडपट्ट्या वाढताहेत. ९५ साली आणि आजच्या झोपडपट्ट्या, फरक बघा.”

“मी बाळासाहेबांना बोललो होतो. झोपडपट्टीवासीयांना फुकट घरं चांगलं नाही. ते बोललो मुंबई आणि भागातील झोपडपट्टीवाल्यांना घरं मिळतील. त्यांचा उद्देश चांगला होता. मोजक्या झोपडपट्ट्या होत्या. मुंबईत घरं मिळतंय म्हटल्यावर लोंढे मुंबईत आले. आज आवरता येत नाही. ठाणे बकाल झालं. पुणे बकाल झालंय. नाशिक चाललंय. मुंबई झालीये. यातील बऱ्याचशा झोपडपट्ट्यामध्ये काय चाललंय.”

“झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रामाणिक माणसांना घरं मिळाली पाहिजे. पोलिसांना घरं मिळाली पाहिजे. आमदारांना कसली घरं वाटता आहात. राजू पाटलांनी पहिला विरोध केला त्याला. मला असं वाटतं की आपण देवाण घेवाण करावी. त्यांना घरं द्यावं, त्यांची फार्म हाऊस आपल्या नावावर घेऊ.”

“खासदार आमदारांची पेन्शन पहिली बंद केली पाहिजे. उपकार करता का? सगळे आमदार-खासदारांना लोकांचं काम करायचं ना, करा काम. पेन्शन कशाला हवीये. कोणत्या आमदारांनी घरं मागितली. त्यात एक कट दिसला. मग ईडीने एक कट केला. मग मुख्यमंत्री संतापले. यशवंत जाधवांवर आयकरची धाड पडली. दोन दिवस होती. काय मोजत होते?”

“हल्ली आईवडिल यशवंत हो सांगत नाही. यशवंत जाधव हो म्हणून सांगतात. अनेक वर्षांपासून पैसे खाल्ले. भूतकाळातील फोटो येतात, त्यात किती सुंदर वाटते मुंबई. बकालपणा आणता आहात शहरात. रस्त्यावरून चालता येत नाही, ठीके. गाडी चालवता येत नाही. नाही चालवता येत चालुद्या. ही तुमची कमजोरी यांना सत्तेत आणते.”

“मुंबई आणि महाराष्ट्रात बकालपणा आणलाय. मी कॉलेजला जात असताना वांद्रेवरून हार्बरने जायचो. कोर्टाच्या बाजूला उजवीकडे सात आठ झोपड्या होत्या. बेहराम पांडा. आज जाऊन बघा. चार-चार मजल्यांचा बेहराम पाडा झाला. मातोश्रीसमोरून रस्ता ओलांडायचा पुढे बेहराम पांडा. काहीही घडलं नाही. काहीही केलं नाही. बेहराम पाडे वाढत आहेत.”

“माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना… आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता आवरता नाकीनऊ येतील इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत.”

“अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच.”

“एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही. मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची.”

“मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. आमचा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्याप्रकारे स्पीकरचा सकाळ पाच वाजल्यापासून त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. कुठेही लाऊडस्पीकर दिसणार नाही. प्रार्थना घरात करा. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडं मंदिर आहेत. टाका धाडी. काय मिळणार घंटा. आमच्याकडे काहीच नाही.”

“जातीत खितपत पडलेला. हतबल. सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेला. कुणासमोरही फरफटत जाणारा. असला समाज नाही आवडत. असल्या लोकांचं नेतृत्व करायला नाही आवडत. मला आरे ला कारे म्हणणारी माणसं हवीत. कोणत्याही सत्ताधाऱ्याची तुमच्याशी गद्दारी करायची हिंमत झाली नाही पाहिजे.”

“मुख्यमंत्री विधानसभेत ठणकावून सांगत होते की, जर तुम्ही माझ्या कुटुंबावर हात घालणार असाल, तर मला अटक करा. आधी कुटुंबाला सांगा मुंबई महापालिकेत जाऊ नको म्हणून. सगळे मुंबई महापालिकेचे पैशाचे व्यवहार या लोकांनी बघायचे. ईडीची नोटीस मलाही आलीये. गेलो ना. यांना चार महिन्यांपूर्वी आलीये. गेले नाहीत. आता संपत्ती जप्त करायला सुरूवात केल्यावर मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा हे सांगत आहेत. जर कुटुंबावर येणार असेल, तर मला अटक करा. हे सगळं २०१९ चं आहे. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, ना? भोगा. राजकारण तुम्हाला जमत असेल, तर समोरचेही करणार. ते काय सोडणार आहेत.”

“या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. बाळासाहेबांच्या नावाखाली वाटेल ते… निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांचा फोटो दाखवायचा आणि यांचे कारभार काय हजारो कोटी रुपये लुटत आहेत. महापौर बंगला. माझे काका असूनही मी त्या बंगल्याला विरोध केला होता. बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल, तर मोठं बांधा. हे चौकटीत कशाला. तुम्हाला बंगला आवडला म्हणून बंगला घेऊ नका. हे सगळे आजही तिकडेच असतात. संध्याकाळी कुणाच्या गाड्या असतात एकदा बघा. सगळ्या परदेशी गाड्या सगळे व्यवहार तिकडे, नाव बाळासाहेबांचं.”

“मुंबई बिल्डरांच्या घशात घालताना… बीएसटीचे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालताना मुंबईत बाळासाहेबांसाठी प्लॉट नाही सापडला स्मारकासाठी? मी तुम्हाला वारंवार हे सांगतोय कारण तुमचं दुर्लक्ष होतं म्हणून ही माणसं अशी वागतात. तुम्ही यांना कोणतंही शासन करत नाही. तुम्ही त्यांना घरी बसवत नाही. एकदा ठाम निर्धार करा. ज्यांनी आमच्याशी गद्दारी केलीये, त्यांना आम्ही मतदान करणार नाही. एकदा वचन घ्या. सुतासारखे सरळ होतील.”

“माझ्याबाबतीतही असेल… माझ्या पक्षातील लोक वागले… बसवा खाली. वचक तुमचाच असला पाहिजे. शिवरायांचे अनुयायी म्हणून सांगतो, तो हा महाराष्ट्र कसा घडला पाहिजे. या महाराष्ट्राने देशाला विचार दिला. हिंदुत्वाचा विचार महाराष्ट्रातून गेला. कम्युनिझमचा विचार महाराष्ट्रातून गेला. समाजवादाचा विचार महाराष्ट्रातून गेला. आंबेडकर चळवळीचा विचार महाराष्ट्रातून देशभर गेला. महाराष्ट्राची अवस्था हतबलतेनं बघता आहात? तुम्ही कोण आहात एकदा आतून बघा. स्वाभिमान गहाण टाकू नका. बाबासाहेब पुरंदरेंच्या एका पुस्तकात छान वाक्य आहे. ज्या समाजाचा स्वाभिमान गहाण पडतो, तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेतं. मला जिवंत प्रेतं नकोय. या महाराष्ट्राचा तळपता इतिहास सांगणारा माणूस जागा असला पाहिजे. तशी शपथ घेऊन आपण इथून निघायचं आहे. शिवजयंती जशी साजरी केली. १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी झाली पाहिजे. महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी दिशा देण्याचं काम केलं. त्यांच्या जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या झाल्या पाहिजेत. हा महाराष्ट्र जिवंत आहे, हे देशाला कळलं पाहिजे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT