मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्येचा दौरा करणार आहेत. आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज ठाकरे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राज ठाकरेंसह, अमित ठाकरे, अनिल शिदोरे यांच्यासह इतर प्रमुख नेतेही हजर होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन 9 मार्चला असणार आहे. या निमित्ताने राज्याच्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राज ठाकरेंनी मेगा प्लान तयार केला आहे. 1 मार्च ते 9 मार्च या दरम्यान एक तारीख ठरवण्यात येईल आणि त्या दिवशी राज ठाकरे हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह अयोध्या दौरा करणार आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी मराठी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात येणार आहे असंही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे मुंबई आणि ठाणे या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेसाठी जाणार आहेत. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालकांचा, मराठी प्रकाशकांचा, संपादकांचा, कवींचा, लेखकांचा, खेळाडूंचा सन्मानही मनसेतर्फे करण्यात येणार आहे. मराठी वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या, नाट्यकलावंत आणि सिनेकलावंत यांचाही सन्मान करण्यात येईल असंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची माहिती दिली.
9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यंदा निवडणुका जवळ आल्याने 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिल या कालवधीत मनसेची सदस्य नोंदणीही केली जाणार आहे. या सदस्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखपत्र देण्यात येणार आहे. गटाद्यक्षांना राजदूत असं नाव दिलं जाईल आणि त्यांना बिल्लाही देण्यात येईल. राजकारणापलिकडच्या सुशिक्षित लोकांनी सूचना कळवाव्यात त्यांच्या कल्पनांचा शहारांच्या विकासासाठी स्वतःहून काम करणाऱ्यांना राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचं पत्रही दिलं जाईल अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.