केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. त्याला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण आलं, त्यानंतर सरकारकडून दिल्ली बॉर्डरवरची सुरक्षा वाढवण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाचीनेही या संदर्भात ट्विट केलं होतं. त्यानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता अक्षय कुमार या सारख्या अनेकांनी ट्विट करत भारताचं अखंडत्व अबाधित राहायला हवं, असं म्हटलं. पण त्यानंतर आता ट्विट करणा-या सेलिब्रिटीजवर मुख्य म्हणजे सचिन तेंडूलकरवर नेटकरींकडून टीका केल्या जात आहेत.
पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यावर अनेकांनी त्यावर आपली मतं मांडली, मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही त्यावर ट्विट केलं. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda, असं ट्विट त्याने केलं. पण त्याच्या या ट्विटनंतर त्याच्यावर आता चहूबाजूंनी टिका व्हायला लागल्या आहेत.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
कधीही कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य न करणा-या सचिनने, अगदी क्रिकेटमधल्या वादाच्या मुद्द्यांवरही मुग गिळून गप्प बसणा-या सचिनने, खासदार असतानाही तोंडातून शब्दही न काढणा-या सचिनने आता अचानक याविषयावर ट्विट कसं केलं असा सवाल नेटकरींकडून केला जातोय.
काही जणं त्याच्यावर राजकारणाचा बळी पडल्याचा आरोप लावतायत, तर काहींनी तर अर्जुनला इंडियन क्रिकेट टीममध्ये स्थान मिळावं म्हणनू सचिनने सरकारची चमचेगिरी केल्याचा आरोप लावलाय.
सचिनपासून कोहलीपर्यंत क्रिकेटपटुंनी केलेल्या या ट्विट्समागे बीसीसीआय आणि जय शाह यांचा हात असल्याचा आरोप काहींनी केलाय. भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांना टॅग करत
कृपया बीसीसीआयसोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंटवरुन ट्विट करु नका, असं म्हटलंय तर, काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. प्रिय बीसीसीआय, कृपया आपल्या क्रिकेटपटूंना बळजबरीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावू नका…हे खूप बालिश दिसतं, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
तुला एका रिहानाचं ट्विट दिसलं, पण इतके दिवस आंदोलन करणारे शेतकरी दिसले नाहीत, त्यांच्यासाठी तुला एकही ट्विट करावसं वाटलं नाही? असा सवाल काहिनी केलाय तर सचिन आम्ही तुला देव समजत होतो, तू तर सैतान निघालास, अशी टीकाही एकाने केलीय.
बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत, असं जर तू रिहानाबद्दल बोलत असशील तर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांचा प्रचार करणं हा हस्तक्षेप नव्हता का असा सवालही काहींनी केलाय. तर कॅपिटॉनवर झालेल्या हल्ल्यावर भारतातील नेते ट्विट करतात तेव्हा तो हस्तक्षेपच असतो असंही काहींना त्याला आपल्या ट्विटमधून बजावलंय.
सचिन हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. तू स्वताची मुल्य विसरून सरकारच्या चुकीच्या प्रयत्नांना बळी पडला आहेस, त्याने तू आत्तापर्यंत कमवलेला आदर गमावला आहेस असंही काहींनी म्हटलंय..
If one tweet rattles your unity, one joke rattles your faith or one show rattles your religious belief then it’s you who has to work on strengthening your value system not become ‘propaganda teacher’ for others.
— taapsee pannu (@taapsee) February 4, 2021
अगदी अभिनेत्री तापसी पन्नूनेही फक्त सचिन नाही तर रिहानाच्या ट्विटला उत्तर देणा-या सगळ्याच सेलिब्रिटवर टीका केलीय.. आपल्या ट्विटमध्ये तापसी म्हणते की, जर एखादं ट्विट आपल्या ऐक्याला धक्का पोहोचवत असेल, एखाद्या विनोदाने तुमचा विश्वास ढऴत असेल किंवा एखादा शोमुळे तुमच्या श्रद्धेना तडा जात असेल तर तुम्हालाच तुमची मुल्यप्रणाली अधिक भक्कम करण्याची गरज आहे, असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. शिवाय सेलिब्रिटिजनी सोशल मीडियावर सनसनाटी हॅशटॅग वापरण्याचा किंवा प्रतिक्रिया देणं योग्य नाही. ते जबाबदारीचं वर्तन नाही, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली आहे.
देशाच्या काही भागातील काही मोजक्या शेतक-यांना कृषी क्षेत्रातील सुधारणांबाबत शंका आहेत, या आंदोलनाबद्दल घाईघाईत प्रतिक्रिया देण्याआधी हा विषय समजून घेण्याची आवश्यकता असल्याचं, भारताकडून सांगण्यात आलंय. त्यावरूनही केंद्र सरकारने खरंच अशाप्रकारे निवेदनातून स्पष्टीकरण देण्याची गरज होती का असा सवाल नेटकरींकडून उपस्थित केला जातोय.