BJP targets Sonia Gandhi after SIT report on Gujarat riots case
BJP targets Sonia Gandhi after SIT report on Gujarat riots case

गोध्रा दंगल प्रकरण : संबित पात्रांनी अहमद पटेलांचं नाव घेत सोनिया गांधींवर केले 2 गंभीर आरोप

२००२ मधील गोध्रा दंगलीनंतर सोनिया गांधींचे तत्कालिन राजकीय सल्लागार यांनी तिस्ता सेटलवाड यांना ३० लाख दिले, मात्र या कटाच्या मुख्य सूत्रधार सोनिया गांधी असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे...

गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या गोध्रा दंगलीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे. गुजरात एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत भाजपने थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भाजपचे नेते संबित पात्रांनी थेट नाव घेत आरोप केले आहे.

२००२ च्या गोध्रा दंगली प्रकरणात गुजरात एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.

गुजरात दंगल : संबित पात्रांनी सोनिया गांधींबद्दल नेमकं काय म्हटलंय?

संबित पात्रा म्हणाले, 'या कटाच्या मागे असलेले लोक कोण होते. अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावरून तिस्ता सेटलवाड आणि इतरांनी गुजरात सरकार अस्थिर करण्याचा कट रचला. यात अहमद पटेल हे एक नाव आहे. त्यांची खरी शक्ती त्यांची बॉस सोनिया गांधी होत्या.'

'सोनिया गांधी यांनी त्यांचे तत्कालिन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या माध्यमातून गुजरातची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच या पूर्ण कटाच्या सुत्रधार होत्या,' असा आरोप पात्रांनी गुजरात एसआयटीच्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत केला.

'काही लोक त्यांच्या षंडयंत्राचा भाग म्हणून हा विषय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर चुकीची माहिती देत होते. या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देताना नोंदवलं होतं. २००२ च्या गुजरात दंगलीमध्ये ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या षडयंत्रानुसार करण्यात आला होता. हे सत्य पावलोपावली समोर येत आहे,' असं संबित पात्रा म्हणाले.

'एसआयटीने प्रतिज्ञापत्रातून न्यायालयासमोर मांडलं आहे की, तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे सहकारी हे राजकीय उद्देशाने काम करत होते. त्यांचे दोन उद्दिष्ट्ये होती. पहिलं होतं त्यावेळचं गुजरात सरकार अस्थिर करणे, दुसरं म्हणजे निष्पाप लोकांना यात अडकवणे. ज्यात नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश होता,' असं संबित पात्रा म्हणाले आहेत.

'एसआयटीच्या माहितीप्रमाणे सोनिया गांधींचे तत्कालिन सल्लागार अहमद पटेल हे या कटाचे सुत्रधार होते. पण अहमद पटेल हे फक्त एक नाव आहे. या सगळ्यांच्या मागे सोनिया गांधींचंच नाव आहे. सोनिया गांधींनी गुजरात आणि नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्याचं षडयंत्र रचलं होतं,' असा गंभीर आरोप संबित पात्रा यांनी सोनिया गांधींवर केला आहे.

'एसआयटीच्या माहितीप्रमाणे या कामासाठी पैसे दिले गेले. सोनिया गांधींनी पहिला हफ्ता म्हणून ३० लाख रुपये तिस्ता सेटलवाड यांना दिला होता. अहमद पटेल आमच्यात नाहीये, पण त्यांनी फक्त ते पोहोचवण्याचं काम केलं. यानंतर सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणि राहुल गांधींना प्रमोट करण्यासाठी कोट्यवधी रुपये देऊन तिस्ता सेटलवाड यांचा वापर केला,' असा आरोपही संबित पात्रांनी केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in