
Sanjay Raut Warned deepak kesarkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्त्यांमध्ये आता वाक् युद्ध सुरू झालंय. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी (Deepak kesarkar) पुन्हा एकदा तुरुंगात पाठवण्याचा इशारा राऊतांना दिला. त्यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) पलटवार केला. (Sanjay Raut Reaction on deepak kesarkar Statement)
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले होते की, 'संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी.' केसरकरांच्या याच विधानावरून संजय राऊतांनी केसरकरांना सुनावलं.
मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "हो, आम्ही आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही. आम्ही तुमच्यासारखे लफंगे पण नाही."
"तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. तुम्ही म्हणजे कायदा नाही. दीपक केसरकर खरोखर असं बोलले असतील, तर 2024 साली त्यांनीही तुरूंगात जायची तयारी ठेवावी", असा इशारा खासदार संजय राऊत यांनी केसरकरांना दिला.
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपावरून संजय राऊतांनी सरकारला लक्ष्य केलंय. "हे सरकारचं अपयश आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मागण्या आहेत आणि याचा राज्यात फटका बसू शकतो. मग डॉक्टरांचा संप असेल, तोही गंभीर आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन असेल, सरकार दोन्ही मुद्द्यावर ढिले राहिले म्हणून महाराष्ट्र आज अंधारात जाताना दिसतोय," असं संजय राऊत म्हणाले.