राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेता पुणे शहरातही आता निर्बंध कडक करण्यात आले आहेत. शहरात रात्री ११ पासून आणि पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना याबद्दल माहिती दिली. याचसोबत पुण्यातील शाळा, कॉलेजंही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा – मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? एक हजारापेक्षा जास्त इमारती सील
याव्यतिरीक्त शहरात आयोजित विवाह सोहळे व इतर समारंभांवरही निर्बंध लागू होणार आहेत. प्रत्येक समारंभात २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही आदेश देण्यात आले आहेत. यासोबत पोलीस परवानगी शिवाय लग्न व इतर सोहळ्यांना परवानगी मिळणार नाहीये. शाळा आणि कॉलेज २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरु ठेवण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पसरल्या होत्या. परंतू सध्यातरी लॉकडाउनचा विचार प्रशासन करत नसून रुग्णसंख्या वाढणाऱ्या भागांमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोनबाबत विचार सुरु असून त्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल असंही प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलंय.
अवश्य वाचा – ऑफिसच्या वेळांमध्ये बदल गरजेचा, केंद्राने धोरणं आखावं !