ठाकरे गटाचे शरद कोळींना अटकेची शक्यता; सुषमा अंधारे भडकल्या, जळगावात काय घडलं?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातला राजकीय संघर्ष दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे गटाने महाप्रबोधन यात्रा सुरू केली असून, याच यात्रेदरम्यान आता ठाकरे गटाचे शरद कोळी यांना अटकेची शक्यता निर्माण झालीये. या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केलीये. महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, शिंदे गट आणि […]
ADVERTISEMENT

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातला राजकीय संघर्ष दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे गटाने महाप्रबोधन यात्रा सुरू केली असून, याच यात्रेदरम्यान आता ठाकरे गटाचे शरद कोळी यांना अटकेची शक्यता निर्माण झालीये. या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केलीये.
महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, शिंदे गट आणि भाजपवर सातत्यानं आगपाखड करणारे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना अटकेची शक्यता निर्माण झालीये. शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते, मात्र त्यापूर्वी शरद कोळी अज्ञातस्थळी रवाना झाले.
शरद कोळींना जळगावमध्ये भाषणबंदी
महाप्रबोधन यात्रेनिमित्त शरद कोळी यांच्या धरणगाव, पाचोरा येथे सभा झाल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव येथेही सभा झाली. येथे शरद कोळी यांनी भाषण केलं. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना कोळी यांनी गुर्जर समाजावर टीका केल्याचा आरोप करण्यात आलेला. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं होतं. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना जळगावात कुठेच भाषण करता येणार नाही, असा आदेश काढला आहे.
शरद कोळी अज्ञातस्थळी जाण्यापूर्वी काय घडलं?
भाषणबंदीचे आदेश काढण्यात आल्यानंतर पोलीस शरद कोळी यांना नोटीस देण्यासाठी आणि ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेल निघाले होते. पोलीस शरद कोळींना अटक करण्याचा संशय शिवसैनिकांना आला. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले.
पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सुषमा अंधारे या इतर पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या दिशेला पायी चालत गेल्या होत्या. या दरम्यान पोलिसांचे आदेश झुगारून शहर पोलीस ठाण्याबाहेरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शरद कोळी महापौरांच्या गाडीतून चोपडा येथे महाप्रबोधन सभेकडे रवाना झाले होते.
सुषमा अंधारे यांच्या गाडीतून जात असलेल्या शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी चोपडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडावद येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान चोपडाकडे निघालेल्या सुषमा अंधारे यांच्या ताफ्यातील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात शरद कोळी नव्हते. शरद कोळी पोलिसांना चकमा देऊन अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती आहे.
शरद कोळींच्या प्रकरणावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे यांनी या घटनाक्रमानंतर शिंदे गटावर टीका केलीये. “शरद कोळी अनुसूचित जमातीचे असल्यामुळे जातीयवादी मानसिकता ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सांगण्यावरून पोलीस ही कारवाई करत आहेत. महाप्रबोधन यात्रेला खीळ घालण्यासाठी ही कारवाई असून, दुसरीकडे प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. किती जणांना तुम्ही अटक कराल?”, असा सवाल करत सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलंय.