सोलापूर : उपोषणामध्ये तीन महिन्यात पोटच्या दोन्ही मुलांना गमावलं; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर : दिव्यांग निधीसाठी तीन महिन्यात पोटच्या दोन मुलांना गमावण्याची वेळ सोलापूरातील चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे आणि कुटुंबीयांवर आली आहे. ५ टक्के दिव्यांग निधी मिळावा म्हणून ३ महिन्यांपूर्वी चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या वैष्णवी रामचंद्र कुरुळे (वय – १३) हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी संभव रामचंद्र कुरुळे (वय – १०) या मुलाचाही उपोषणादरम्यानच मृत्यू झाला.

नेमका काय आहे प्रकार?

सोलापूर जिल्ह्यातील चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे आणि कुटुंबीय ऑगस्ट महिन्यात दिव्यांग निधी मिळावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मागण्यांची पूर्तता न झाल्याने उपोषण करत असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

दरम्यान, या उपोषणादरम्यान रामचंद्र कुरुळे यांची मुलगी वैष्णवी हिचा मृत्यू झाला. कुरुळेंच्या दाव्यानुसार, वैष्णवीच्या निधनानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल आणि १५ दिवसांत रखडलेला दिव्यांग निधी देण्यात येईल असं आश्वासन त्यांना देण्यात आलं. या आश्वासनानंतरच वैष्णवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र आश्वासन पूर्ण न झाल्याचं सांगतं कुरुळे कुटुंबीय पुन्हा एकदा उपोषणाला बसले. यावेळी कुरुळे यांनी स्मशानभूमीतच उपोषणची सुरुवात केली. याच उपोषणादरम्यान रविवारी संभव कुरुळे या मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. निधीसाठी आधी मुलगी गमावली आणि आता मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मुलावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका कुरुळे दाम्पत्याने घेतली आहे.

निधनानंतर एखाद्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी घरुन स्मशानभूमीत नेला जातो. पण मृत्यूनंतर का होईना मुलाला न्याय मिळावा म्हणून रामचंद्र कुरुळेंवर मुलाचा मृतदेह स्मशानभूमीतून घरी परत आणण्याची नामुष्की ओढावली आहे. न्याय न मिळाल्यास मुलाचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असल्याचा इशारा रामचंद्र कुरुळे यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT