Mata vaishno devi : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

stampede at bhawan mata vaishno devi : पहाटे तीन वाजेच्या सुमाराला घडली घटना
Mata vaishno devi : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी
वैष्णोदेवी मंदिराचं संग्रहित छायाचित्रAajtak

जम्मू काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिर भवनमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना नव्या वर्षाच्या पहाटेलाच घडली. या घटनेत 13 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 2:45 वाजता ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिर भवनामध्ये पहाटे पाऊणेतीन वाजताच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. कुठल्यातरी गोष्टींवरून भाविकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर धावपळ उडाली, असं जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी प्राथमिक माहितीच्या आधारे सांगितलं आहे.

या चेंगराचेंगरीत तब्बल 12 भाविकांचा मृत्यू झाला असून, 13 जण जखमी असल्याची माहिती आहे. कटरा रुग्णालयातील डॉ. गोपाल दत्त यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. जखमींना नारायणा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

नववर्षानिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. त्याचदरम्यान ही घटना घडली. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, मृतांमध्ये दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. इतरांची ओळख पटवण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. 'माता वैष्णोदेवी मंदिर भवनामध्ये चेंगराचेंगरी होऊन भाविकांचा मृत्यू झाल्याचं ऐकून दुःखी झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमींची प्रकृती पटकन बरी होवो, अशी ईश्वराकडे प्रार्थना', अशा शब्दात मोदींनी भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, उधमपूरचे खासदार डॉ. जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंदर राय यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती घेतली. जखमींना उपचारासह इतर सर्वोतोपरी मदत करण्याची सूचना केली. मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी वैष्णोदेवी मंदिर भवनमध्ये झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमींची प्रकृती लवकर बरी होवो, अशी प्रार्थना करतो, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in