August Kranti Din : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रांती दिनाची ‘ती’ पोस्ट वादात; काय झाली चूक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

९ ऑगस्ट, क्रांती दिन! ब्रिटिश राजवटीविरुद्ध पुकारण्यात आलेल्या ‘चले जाव’ लढ्याचं स्मरण करण्याचा दिवस. याच लढ्यात महात्मा गांधी यांनी ‘लढेंगे या मरेंगे’ असा इशारा ब्रिटिशांना दिला. मात्र, या लढ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या स्वातंत्र्यसेनानींचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वावडं आहे का? असं प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त केलेल्या पोस्टवरून लोक उलट सवाल करत आहेत.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या पोस्ट वादात का?

9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतिकारकांना अभिवादन करणारी पोस्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लोकमान्य टिळक, वि.दा. सावरकर, क्रातिकारक भगतसिंग यांच्यासह इतर स्वातंत्र्य सेनानींचे फोटो आहेत.

हे वाचलं का?

क्रांती दिन का साजरा केला जातो?

दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटिशांनी भारताची मदत घेतली. त्यावेळी भारत सोडून जाऊन असं वचन ब्रिटिशांनी दिली होती. पुढे ब्रिटिशांनी शब्द पाळला नाही. त्याची प्रतिक्रिया उमटली ती, ८ ऑगस्टला. महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली. ‘चले जाव’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ या दोन घोषणांनी ब्रिटिशांना धडकी भरवली.

या आंदोलनाची सुरूवात ज्या मैदानातून झाली, त्या मुंबईतील मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखलं जातं. या आंदोलनासाठी भारतीय काँग्रेसने ४ जुलै १९४२ रोजी मुंबईत झालेल्या अधिवेशनात एक ठराव मांडला होता. ब्रिटिश भारत सोडून गेले नाही, तर त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा हा ठराव होता.

ADVERTISEMENT

या ठरावाला विरोध करत काँग्रेसचे नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी पक्ष सोडला. तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांनी महात्मा गांधींच्या आवाहनानंतर पाठिंबा दिला. या ठरावाला मुस्लीम लीग, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेनं विरोध केला होता.

ADVERTISEMENT

भारत छोडो ठराव मंजूर झाल्यानंतर ब्रिटिशांनी महात्मा गांधींना अटक केली. महात्मा गांधींना पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं. तसेच काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यांना अहमदनगर येथील तुरुंगात डांबण्यात आलं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केली.

९ ऑगस्ट रोजी मुंबईतील गवालियाँ टॅंक मैदानावर अरुणा असफअली यांनी तिरंगा फडकावला आणि छोडो भारत आंदोलनाची ठिणगी पडली. संपूर्ण देशातून जनता रस्त्यावर उतरली. सरकारी इमारतींची जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी बॉम्बस्फोटही घडवण्यात आले. यात ब्रिटिशांकडून अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आला. यात अनेकजण हुतात्मा झाले.

ऑगस्ट क्रांती दिन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर का होतेय टीका?

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त केलेल्या पोस्टवरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका होतेय. वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके यांच्यासह इतर स्वातंत्र्यसेनानींचा ऑगस्ट क्रांती दिनाशी संबंध नाही. त्यावरूनच मुख्यमंत्र्यांवर टीका होतेय.

रोहन नावाच्या यूजरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावरून टोला लगावला आहे. “कृपया वरील यादीमध्ये शरद पोंक्षे, योगेश सोमण, तुषार भोसले, कंगना राणावत, पायल रोहतगी यांचे नाव सुद्धा अ‍ॅड करावं ही विनंती”, असं म्हटलं आहे.

राहुल नावाच्या यूजरने म्हटलंय की, “सावरकर आणि संघ ब्रिटिशांच्या बाजूने होते. क्रांती दिवसाच्या वेळी, ज्यांनी खरंच क्रांती दिवसात योगदान दिलंय, त्यांचे फोटो कुठंय?? RSS वाले page चालवत आहे काय तुमचं?”

क्रांती दिनाच्या पोस्टवर आक्षेप नोंदवत चेतन शेडगे नावाच्या यूजरनेही टोला लगावला आहे. “फक्त सावरकरांचा फोटो ठेवला असता, तरी चाललं असतं. कारण माफी मागणारे ते एकमेव ‘क्रांतिकारी’ होते.”

भाऊसाहेब आजबे यांनीही यावरून एकनाथ शिंदेंवर टीका केलीये. “मा.मु.महोदय, सावरकर वा त्यांच्या हिंदू महासभेचा ‘चले जाव आंदोलना’शी तिळमात्रही सहभाग नव्हता. उलट त्यांनी अनुयायांना ब्रिटिश लष्करात सहभागी होण्याचा आदेश दिला होता. महासभेच्या काही वीरपुरुषांनी ब्रिटिशांचे खबरे म्हणून काम केले होते. बाकी माफी,पेन्शनचा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच”, असं म्हटलंय.

नितीन घरत या यूजरनेही या पोस्टवर मत मांडताना म्हटलंय की, “अहो तुम्ही मुख्यमंत्री आहात. आपण जो फोटो टाकला आहात, त्यामधील किती लोक 9 ऑगस्ट 1942 साली भारत छोडो आंदोलनामध्ये सहभागी होते. बाकीचे मान्य करू, पण ज्यांनी या आंदोलनाला विरोध केला त्या सावरकरांचा फोटो.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT