महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? संजय राऊत यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी घेतली जाणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना सामोरे जाताना उद्धव ठाकरे काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांची मुलाखत नेमकी काय असणार आहे त्याची उत्सुकता शिगेला!

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? नक्की काय चुकलं असं वाटतं? आत्ता जे बंड शिवसेनेत झालं आहे तेवढं मोठं बंड राणे-भुजबळांनाही करता आलं नव्हतं मग या बंडाबाबत काय सांगाल?असे अनेक थेट प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी या मुलाखतीचा टिझर ट्विट केला आहे. त्यातही हे प्रश्न आहेत, याशिवायही अनेक प्रश्न थेटपणे विचारले गेले असणार आणि उद्धव ठाकरे त्याची थेट उत्तरं देणार हे उघड आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का? हाच. या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे काय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचा उदय कसा झाला?

महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात २०१९ मध्ये झाला. भाजप आणि शिवसेनेने महायुती महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ असं १६१ जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचं या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचं भांडण झालं. त्यानंतर महायुती तुटली. महायुती तुटल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबत येण्याची खलबतं सुरू झाली. त्याच दरम्यान राज्यात पहाटेचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र शरद पवारांनी अजित पवारांनी केलेलं बंड मोडून काढलं. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचं सरकार ७२ तासात कोसळलं.

हे वाचलं का?

Uddhav Thackeray: “धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे, शिवसेनेचाच राहणार”

या घटनेनंतर महाराष्ट्राच्या इतिहासात न भुतो, न भविष्यती असा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अडीच वर्षे हे सरकार चाललं. त्यानंतर २१ जून २०२२ ला शिवसेनेतलं बंड झालं. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारत शिवसेना पक्ष नेतृत्वावरच आक्षेप घेतला. आता शिवसेना हा पक्ष दुभंगला आहे. तो एकसंध करण्याचं आणि पुन्हा नव्याने बांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंच्या समोर आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना कशी दुभंगली?

२१ जूनला महाराष्ट्रात शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारलं. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला आहे. त्यामुळे आम्ही हा उठाव केला आहे ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांच्या साथीला ४० आमदारही आले. आधी हे सगळेजण सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. भाजपने या सगळ्यांना पाठिंबा देत राज्यात सरकार स्थापन केलं. त्याआधी महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला होता.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते मात्र संजय राऊत यांनी खोडा घातला”; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या प्रश्नावर काय बोलणार उद्धव ठाकरे?

महाविकास आघाडीचा प्रयोग मान्य नाही म्हणूनच शिंदे गट आपल्या आमदारांसह बाहेर पडला आहे. त्यांनी बंड केलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे १२ खासदारही आहेत. तसंच ७५ टक्के शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडली अशी चर्चा आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात आहोत असं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब ठरते ती महाविकास आघाडीची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत या दोघांकडेही महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख महाविकास आघाडीचा प्रयोग खरोखर फसला का? या प्रश्नावर नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

३० जूनला राज्यात काय घडलं?

राज्यात ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता एकनाथ शिंदे हे पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न विचारत त्याचे कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे. ८ ऑगस्टपर्यंतही मुदत देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने धनुष्य-बाण कुणाचा हा प्रश्नही संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याआधी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत धनुष्य-बाण आपलाच आहे आणि आपलाच राहिल ही गर्जना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे जाहीर मुलाखतीत काय बोलतील हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे.

राज ठाकरेंच्या आरोपांना उद्धव ठाकरे उत्तर देणार का?

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना दुभंगली असं राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत नुकतंच म्हटलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हा विश्वास ठेवावा असा माणूस नाही. महाराष्ट्रातल्या कुणाहीपेक्षा मी त्या माणसाला जास्त ओळखतो असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप चर्चेत आहेत. संजय राऊत यांच्या मुलाखतीत हे प्रश्न असणार का?तसंच उद्धव ठाकरे त्यावर उत्तर देणार का? हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT