Ana Montes : १७ वर्ष अमेरिकेच्या नाकाखालून हेरगिरी करणारी ‘डबल एजंट’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(US releases top Cuba spy Ana Belen Montes after 20 years in prison)

ADVERTISEMENT

अ‍ॅना बेलेन मोंटेस. हे नावं ऐकलं तरी अमेरिकन नागरिकांच्या, प्रशासनाच्या अंगावर आजही काटा येतो. स्वकियाकडूनच मिळालेला धोका, प्रशासनाच्या नजरेत केलेली धूळफेक, यंत्रणांना दिलेला चकवा आणि तेही थोडं-थोडका नाही, तब्बल १७ वर्ष चालू असलेला हा खेळ झटकन नजरेसमोर उभा राहतो. हिच अ‍ॅना आता तुरुंगातून बाहेर आली आहे. तब्बल २१ वर्षांच्या शिक्षेनंतर तिला अमेरिकन सरकारनं तुरुंगाबाहेर काढलं आहे.

२००१ मध्ये अ‍ॅनाला अटक झाली तेव्हा ती तिचं वय ४४ होतं, आज ती ६५ च्या घरात पोहचील आहे. पण अद्यापही तिच्याकडे त्याचं संशयाचं नजरेनं बघितलं जातं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. अ‍ॅना बेलेन मोटेंस हिला अमेरिकेच्या इतिहासात ‘मोस्ट डेडली वुमन’ असं म्हटलं जातं. अमेरिकेची गुप्तहेर असून देखील स्वतःच्या देशाविरुद्ध काम करुन अमेरिकेची मोठ्या प्रमाणावरील गुप्त माहिती क्युबाला पुरविल्याचा अ‍ॅनावर आरोप आहे.

हे वाचलं का?

याच अ‍ॅनाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

२००१ चं वर्ष. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्याला १० दिवस झाले होते. अमेरिकेच्या तपास यंत्रणा रात्रीचा दिवस करुन काम करत होत्या. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या हल्ल्याचे हल्लेखोर जिथं कुठं असतील तिथून आणून त्यांना शिक्षा दिली जाईल, असं देशाला जाहीर वचन दिलं होतं. या सगळ्याचा तणाव तपास यंत्रणांवर होता.

अ‍ॅना जिथं काम करायची त्या DIA अर्थात ‘डिफेंस इंटेलिजंस एजेंसीट’च्या ऑफिसमध्येही हा तणाव जाणवतं होता. मागच्या १७ वर्षांपासून अ‍ॅना याच ऑफिसमध्ये काम करत होती. हे काम तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं होतं. तिच्या शरीराला देखील ही दिनचर्या अंगवळणी पडली होती. २१ सप्टेंबर २००१ ला अ‍ॅनाने आपली बॅग तिच्या डेस्कवर ठेवली. काही फाईल्स काढल्या आणि मीटिंग रुममध्ये निघाली. मीटिंग रुममध्ये आता मीटिंग सुरु होणार तेच, दरवाज्यावर ‘टकटक’ झाली.

ADVERTISEMENT

फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन्सचे अधिकारी आतमध्ये आले. त्यांनी बेड्या टेबलवर ठेवल्या आणि अ‍ॅनाच्या दिशेने पाहतं म्हणाले,

ADVERTISEMENT

मिस अ‍ॅना बेलेन मोंटेस, यू आर अंडर अरेस्ट! यू मे आस्क फॉर अ लॉयर…

त्या रुममध्ये बसलेल्या इतर लोकांच्या पायाखाली जमीन सरकली होती. त्यांच्यासाठी हे वाक्य प्रचंड धक्का देणारं होतं. पण अ‍ॅनाच्या चेहऱ्यावरील भाव जराही बदलले नव्हते. काही तरी आश्चर्यचकित करणार घडलं आहे, असं तिच्याकडे बघून अजिबातचं वाटतं नव्हतं.

एवढ्यात अ‍ॅनाने आपण वकिलाला बोलवणार असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं. काही वेळातच वकील तिथं दाखलं झाले आणि चर्चेअंती अ‍ॅनाने त्या अधिकाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅनावर डबल एजंट होण्याचा आरोप होता. अ‍ॅना DIA मध्ये क्युबा डेस्कवर काम करत होती. तिचं काम होतं, क्युबामधून गुप्त माहिती काढणं आणि अमेरिकन सरकारची मदत करणं. याच्या ऐवजी अ‍ॅना अमेरिकेची गुप्त माहिती, सुचना क्युबा सरकारला देत होती. पूर्ण १७ वर्ष!

अ‍ॅनाने केलेल्या गुन्ह्याला अमेरिकेमध्ये फाशीची शिक्षा आहे. पण २००२ मध्ये अ‍ॅनाने गुन्ह्यांची कबुली दिली आणि तिची फाशी रद्द करुन तिला २५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. अ‍ॅनामुळे अमेरिकीची मोठ्या प्रमाणावरील संवेदनशील गोपनीय माहिती इतर देशांसोबत शेअर झाली होती. अमेरिकेच्या अनेक गुप्त मोहिमांना यामुळे धक्का बसला होता. अमेरिकेच्या एजंट्सला धोका निर्माण झाला होता. अमेरिकेला झालेल्या नुकसानीची मोजदाद करता येत नव्हती.

अ‍ॅनाने आपल्याच देशाला धोका का दिला?

आता प्रश्न असा की, अ‍ॅनाने आपल्याच देशाला धोका का दिला? आपल्याच देशासोबत गद्दारी करुन अ‍ॅनाने काय मिळवलं? अ‍ॅना कोण होती, तिचं खाजगी आयुष्य कसं होतं? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरात याच रहस्य दडलेलं आहे.

१९५७ चं वर्ष. पश्चिम जर्मनीच्या न्युरेमबर्ग भागात अमेरिकेचा एक लष्करी तळ होता. याच लष्करी तळावरील हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरांच्या घरात अ‍ॅनाचा जन्म झाला. तिचे आजोबा प्युअर्तो रिकोवरुन आले होते. प्युअर्तो रिको हे कॅरिबियन बेटावर वसलेले आहे. १८९८ च्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धापासून हा भाग अमेरिकेचा भाग आहे. मात्र अद्याप त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळू शकलेला नाही. या भागात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे स्पॅनिश भाषेचं बाळकडू अ‍ॅनाला घरातूनच मिळालं होतं. हेच ज्ञान पुढे अ‍ॅनाचं आयुष्य बदलणार होतं.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर अ‍ॅनाला अमेरिकेच्या न्याय विभागात नोकरी मिळाली. अ‍ॅना प्रचंड हुशार होती. तिची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होती. याच जोरावर अ‍ॅनाला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनमध्ये प्रवेश मिळाला. याच मंत्रालयाच्या गुप्तचर शाखेत अर्थात DIA मध्ये तिची नियुक्ती करण्यात आली.

१९८५ चं वर्ष. अमेरिका-रशियामध्ये सुरु असलेलं शीतयुद्ध संपण्याच्या मार्गावर होतं. साम्यवादाचा विस्तात थांबण्याच्या नावाखाली अमेरिकेने मध्य अमेरिकेतील अनेक देशांतील राजवटी उलथून टाकल्या होत्या. क्युबा हा त्यापैकीच एक देश. १९५२ मध्ये अमेरिकेच्या पाठिंब्याने बतिस्ता हा लष्करी हुकूमशहा तिथं सत्तेवर आला होता. जानेवारी १९५९ मध्ये फिडेल कॅस्ट्रोंची क्युबातील बॅटिस्ता सरकारविरुद्धची क्रांती यशस्वी झाली आणि हुकूमशाही राजवट संपुष्टात आली.

बतिस्ता सरकार पायउतार झाल्यानं अमेरिकेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतरच्या काळात अमेरिकेने फिडेल कॅस्ट्रोंची हत्या करण्याच्या आणि तिथलं सरकार उलथवून टाकण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या, पण त्यापैकी एकाही मोहिमेला यश आलं नाही. क्युबा ही अमेरिकेची ठसठसणारी आणि सतत वेदना देणारी जखम होती. सोव्हिएत युनियनच्या विघटनावेळीही क्युबाने गुडघे टेकले नव्हते. त्यामुळेच ८० च्या दशकात अमेरिकेच संपूर्ण लक्ष्य क्युबावर होता.

क्युबाही १८९८ पर्यंत स्पेनची वसाहत होती. सहाजिक स्पॅनिश हिच क्युबाची मुख्य भाषा आहे. त्यामुळे अमेरिकन यंत्रणांनी स्पॅनिश लिहु-वाचू शकणाऱ्या हुशार लोकांची भरती चालू केली. या यंत्रणांसाठी अ‍ॅनाचं ज्ञान उपयोगी पडणार होतं. त्यामुळेच अ‍ॅनाला DIA च्या क्युबा डेस्कवर नियुक्त करण्यात आलं. तिथं ती क्युबाशी संबंधित गुप्त फाईल्सची जबाबदारी संभाळू लागली.

FBI ला तपासादरम्यान कळालं की इथं रुजु होण्यापूर्वीच अ‍ॅना डबल एजंट म्हणून काम करत होती. खरंतर शिक्षणाच्या वेळीच अ‍ॅना अमेरिकेन विचारधारेच्या विरोधात होती. अभ्यासादरम्यान ती तिच्या गटात अमेरिकेवर टीका करायची.

तिचं मत होतं की, सरकार मध्य आणि लॅटिन अमेरिकेतील देशांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन करत आहे. सरकारला असं करण्याचा काही एक अधिकार नाही.

तत्कालीन रोनाल्ड रेगन सरकारच्या विरोधात झालेल्या अनेक आंदोलन आणि निघालेल्या मोर्चांमध्ये अ‍ॅना सहभागी व्हायची.

त्याकाळात अमेरिकेत क्युबाचे अनेक एजंट्स काम करायचे. यातीलच एका एजंटची नजर अ‍ॅनावर पडली. त्याने अ‍ॅनाच्या मनात क्युबाविषयी आणखी सहानुभूती तयारी केली आणि तिला डबल एजंट म्हणून काम करण्यासाठी तयार केलं. १९८५ साली अ‍ॅना युरोपमार्गे पहिल्यांदा क्युबाला गेली. या दौऱ्यादरम्यान अ‍ॅनाने अमेरिकेचा लष्करी तळ ‘ग्वांतनामो बे’ला भेट दिली. मागील अनेक वर्षांपासून क्युबा हा भाग परत मागतं आहे. अ‍ॅना संपूर्ण क्युबाचा दौरा केला, तिथं परिस्थिती बघितली.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, याच दौऱ्यात अ‍ॅनाला क्युबा सरकारसाठी हेरगिरी करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या दौऱ्यानंतर क्युबा अ‍ॅनासाठी दुसरं घर बनलं होतं. क्युबाला जाण्यासाठी अ‍ॅना कारण शोधतं असायची. अ‍ॅनाने कायम एक काळजी घेतली की ती थेट क्युबाला कधीच गेली नाही. ती आधी युरोपमध्ये जायची. तिथून वेष बदलून ती क्युबाला जायची. हा खेळ सतत १७ वर्ष सुरु होता.

अ‍ॅना पकडली कशी गेली?

अ‍ॅनाने १७ वर्षांच्या काळात अमेरिकेच्या गुप्तचर विभागातून एकही कागद चोरी केला नाही. ती फाईलींमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर ती त्याचा एक कोड तयार करायची आणि सार्वजनिक फोनवरुन ती क्युबाच्या एजंट्सला पुरवायची. क्युबाचे एजंट शॉर्टवेव रेडिओच्या माध्यमातून अ‍ॅनाशी संपर्क साधायचे.

एकीकडे हा खेळ चालू असतानाच अ‍ॅनाच्या DIA मधील कामात कुठेही कसर नव्हती. १९९७ मध्ये तिला ऑफिसमध्ये एक पुरस्कार देखील मिळाला होता. तिला तिच्या कामामुळे ‘क्युबाची महाराणी’ म्हणून ओळखही मिळाली होती. यंत्रणेत तिच्यापेक्षा क्युबाबद्दल चांगली माहिती क्वचितचं कोणाकडे असायची.

पण त्या एका दिवसाने अ‍ॅनाचे आयुष्य बदललं. अ‍ॅना यंत्रणेच्या वरिष्ठ लोकांच्या नजरेत आली. १९९५ मध्ये पेंटागॉनमध्ये एक आपातकालीन बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला अ‍ॅना उपस्थित नव्हती. त्यामुळे तिच्यावर काही दिवसांसाठी कारवाईही झाली. तिला निलंबित करण्यात आलं. DIA ला अ‍ॅनावर शंका आली होती. यानंतर अ‍ॅनाच्या खाजगी आयुष्यावर प्रकाश टाकण्यास सुरुवात झाली.

तपास सुरु असतानाच १९९९ मध्ये FBI ला DIA मध्ये एक डबल एजंट असल्याची माहिती मिळाली. तो एजंट ग्वांतनामो दौऱ्यावरुन आला असल्याची माहितीही जोडीला होती. जेव्हा DIA ला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांचा पहिला इशारा अ‍ॅनाकडे होता. यंत्रणांनी अ‍ॅनाचा लॅपटॉप आणि फोनचे रेकॉर्ड्स काढले. अनेक महिने तिच्यावर लक्ष ठेवण्यात आलं. तिच्या घरावर छापेमारी करण्यात आली, तिथं त्यांना शॉर्टवेव रेडिओ मिळाला. एजन्सीजवळ सगळे पुरावे आल्यानंतर त्यांनी अ‍ॅनाला ताब्यात घेतलं.

या कामासाठी अ‍ॅनाला किती मोबदला मिळाला?

खरंतरं डबल एजंट म्हणून काम करण्यासाठी अ‍ॅनाला एक रुपायाही मिळाला नाही. पैशांच्या लोभापोटी तिनं हे काम केलचं नव्हतं. केवळ क्युबाने तिच्या तिकिटांसाठी काही पैसे दिले होते. मात्र, त्याशिवाय अ‍ॅनाने कधीही पैशांची मागणी केली नाही. अ‍ॅनाने हे काम केलं ते केवळ तिच्या विचारधारेसाठी! न्यायालय जेव्हा अ‍ॅनाला शिक्षा सुनावत होते, तेव्हा देखील ही गोष्ट दिसून आली.

अ‍ॅना म्हणाली होती, त्यांना सुरक्षित ठेवणं हे मला माझं नैतिक कर्तव्य वाटलं. कारण आपण आपली मूल्य आणि आपली राजकीय व्यवस्था त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत होतो. अन्यायाची आणि क्रूरतेची ही परिसीमा होती.

अ‍ॅनाने आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही तिने केलेल्या तिच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला नाही. अ‍ॅनाच्या कृतीमुळे अमेरिकेचं किती नुकसान झालं याचा अंदाजही लावता येणार नाही. अ‍ॅनाच्या शिक्षेवर क्युबाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. केवळ २०१६ मध्ये, क्युबाने एकदा तिच्या सुटकेची मागणी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. अ‍ॅना बेलेन मॉटेंस आता ६५ वर्षांची आहे. तिचा इथून पुढचा बराचसा काळ हॉस्पिटलच्या बेडवर जाईल, असं डॉक्टरांच म्हणणं आहे. पण यानंतर देखील पुढील पाच वर्षे अमेरिकन सरकार तिच्यावर लक्ष ठेवणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT