सातपुडाच्या रांगात, तापीच्या खोऱ्यात, गांजा शेती जोरात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर महाराष्ट्रातला धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा…निसर्गाचे वैभव लाभलेला हा जिल्हा सातपुडाच्या पर्वतरांगानी आणि तापीच्या सानिध्याने समृध्द बनला आहे. सातपुडयाच्या पर्वत रांगामुळे आणि जंगलामुळे धुळ्यातला शिरपुर आणि साक्री तालुका हा भाग दुर्गम मानला जातो. इथे बहुसंख्य भागात आदिवासी जमातींचे प्राबल्य आहे. हा भाग छोट्या छोट्या टेकड्यांनी बनलेला आहे आणि येथे पोचणे अवघड आहे आणि याच सर्व कारणांमुळे हा भाग महाराष्ट्रातल्या गांजा शेतीचे प्रमुख केंद्र बनला होता

भारतात गांजाचे सेवन करणे हा बऱ्याच ठिकाणी लोकपरंपरेचा भाग असला आणि ग्रामीण भागात गांजाचे सेवन सर्रास केले जात असले तरी गांजाचे सेवन करणे,लागवड करणे आणि त्याचा व्यापार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण गांजाला असलेली मोठी मागणी आणि चढ्या भावाने मिळणारी किंमत यामुळे धुळ्यातल्या दुर्गम भागातले आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीकडे ओढले जातायेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गांजाच्या शेतीला पूरक प्रदेश ?

धुळे पोलीसांनी गेल्या वर्षभरात गांजाच्या अवैध शेतीवर वारंवार छापेमारी केली, तेव्हा त्यांना धुळ्य़ातल्या या गांजाशेतीचा एक विशिष्ट पॅटर्न आढळून आला. शिरपूर आणि साक्री या दुर्गम समजल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये डोंगराळ भागाच्या बेचक्य़ात गांजाची शेती केली जाते. या भागात दुर्गमतेमुळे रस्ते नाहीत, जंगली प्रदेश, आदिवासी भाग, दुर्मीळ लोकसंख्येचा प्रदेश या सर्व कारणांमुळे इथपर्यंत सहसा कोणी पटकन पोचू शकत नाही आणि त्याचमुळे धुळ्यातला हा भाग गांजा शेतीचा नंदनवन बनत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

गांजाची शेती कशी केली जाते?

गांजाच्या रोपांची लागवड ही बाजरी, मका, कापूस या पीकांच्या मध्ये केली जाते. बाजरी किंवा मका यांच्या झाडांशी गांजाची झाडे मिळतीजुळती असल्याने लांबून बघितले असता या दोन पीकांमधला फरक पटकन कळून येत नाही. तसेच तुरीची पीकातसुध्दा गांजाच्या रोपांची लागवड केली जाते. दिवाळी संपली की रब्बी हंगामातल्या पीकांसोबतच गांजाच्या पीकांचा मोसम असतो. पावसाळ्यानंतर लावलेली रोपं 4 ते 6 महिन्यात हाताशी येतात आणि नंतर त्यांची तोडणी केली जाते आणि विक्रीला शहरांमध्ये पाठवली जातात. फेब्रुवारीनंतर या गांजाच्या पीकांचा हंगाम संपून जातो. तसेच गांजाच्या पीकाला पाणी कमी लागत असल्याने कोरडवाहू जमीनीवर गांजाची लागवड करणे सहज शक्य असते. त्यामुऴे धुळ्याच्या डोंगराळ भागात गांजाच्या लागवडीला पोषक अशी परिस्थिती आहे.

गांजाच्या रोपापासून कसा बनतो गांजा?

गांजाची ओली रोपं तोडल्यानंतर त्यांना वाळवून त्यांची भुकटी केली जाते आणि ही वाळलेली पाने गांजा म्हणून विकली जातात. गांजाच्या हिरव्य़ा पाल्याचे रुपांतर हे ‘भांग’ य़ा अमली पदार्थात केले जाते. ही भांग आपल्याकडे महाशिवरात्री किंवा रंगपंचमीला सर्रास प्यायली जाते. गांजा बनवताना कोणतेही केमिकल्स वापरले जात नाही त्यामुळे गांजा उत्पादनाची प्रक्रिय़ा सोपी मानली जाते.

सरकारी वन जमिनीवर चालते गांजाची शेती?

सातपुडा पर्वतरांगामधल्या या जमिनी वनखात्याच्या ताब्यात आहेत. या वनखात्याच्या जमिनी या भागातल्या स्थानिक आदिवासींनी कसण्यासाठी दिल्या जातात. या सरकारी जमिनीवर गांजाची शेती केली जाते. या जमिनीवर शेती केल्याने जमिनीच्या मालकाचे नाव कागदोपत्री पुढे येत नाही. त्यामुळे पोलिसांनी जरी छापेमारी केली तरी गुन्हा नोंदवताना अडचणी येतात.

तसेच गांजा आणि तत्सम अंमली पदार्थांची माहिती सगळ्या शेतकऱ्यांना नाही त्यात ही शेती करणे बेकायदेशीर असते याची पण माहिती नाही त्यामुळे गांजाची लागवड सर्रास केली जाते.

गांजाचे भाव कसे ठरतात?

धुळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर गांजाचे दर कसे ठरवले जातात याची सविस्तर माहिती दिली. यानुसार गांजा पकडल्य़ानंतर त्यांचे वर्गीकरण तयार गांजा माल आणि गांजाच्या वनस्पती असे केले जाते. बाजारभावानुसार गांजाच्या तयार मालाची किंमत ही शहरांमध्ये 10 ते 15 हजार किलो इतकी असते. त्यानुसार गांजाच्या झाडाची किंमत प्रती किलो 1 ते 2 हजार अशी लावली जाते. त्यामुळे जेव्हा गांजाचा मुद्देमाल पकडला जातो तेव्हा बाजारात चालू असलेल्या गांजाच्या किंमतीनुसार मुद्देमालाची किंमत ठरवली जाते. तसेच पोलीसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी गांजाच्या किंमतीची माहिती घेतली जाते.

धुळे पोलीसांची धडक कारवाई

धुळे जिल्हातल्या या परिस्थितीचा सखोल अभ्यास करुन धुऴे पोलीसांकडून गांजा शेतीची त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती घेऊन हे रॅकेट उद्धस्त करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गाव पातळीवर ग्रामसभा घेऊन जनजागृती तर केली जात आहेत पण गेल्या वर्षभरात धुळे पोलीसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या वर्षभरात धुळे पोलीसांनी गांजा शेतीसंदर्भात तब्बल 35 गुन्हे नोंदवले आहेत तर 56 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या वर्षभरात धुळे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ही 3 कोटी 80 लाख इतकी आहे. धुळे पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गांजाच्या शेतीला चांगलाच आळा बसला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT