Ajit Pawar: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनाही सांगितलं की सरकारमध्ये वाचाळवीर वाढलेत”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मी दिवाळीच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही भेट घेतली होती. मी त्या दोघांनाही ही बाब लक्षात आणून दिली की तुमच्या सरकारमध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली आहे त्यांना आवर घाला. मंत्री असून काहीही बोलत आहेत त्यांना समज द्या असं मी या दोघांनाही वेगवेगळं भेटून सांगितलं आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी या सरकावर आरोपांच्या फैरी झाडल्या.

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

हे सरकार कशा पद्धतीने आलं त्याच्या खोलात मी जाणार नाही. आल्यानंतर हे सरकार नवं होतं. मात्र हे सरकार आल्यापासून पोलीस प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही. पोलीस जर अशा दबावात काम करत असतील तर पुढे अनेक गोष्टी कठीण होत जातील. मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनाही थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश येतात. एवढं त्यांच्यावर प्रेशर येत असेल तर परिस्थिती बिकट होत जाईल असं अजित पवार म्हणाले आहेत.

कोरोना काळात पोलिसांनी खूप चांगलं काम केलं

जनतेचा विश्वास आजही पोलिसांवर आहे. कोरोना काळात आम्ही स्वतः पाहिलं की पोलीस जेव्हा कठोर भूमिका घेत होते तेव्हा नागरिकांनी पोलिसांचं ऐकलं. मात्र गेल्या चार महिन्यात राज्यात जी काही परिस्थिती आहे ती जर अशीच राहू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री दोघांनीही लक्ष घातलं पाहिजे. काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा सहकाऱ्याचं चुकत असेल तर सांगावं लागतं की हे तुमचं चुकतं आहे. मात्र तसं आज होताना दिसत नाही. हीच परिस्थिती राहिली तर राज्याचं चित्र गंभीर होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अब्दुल सत्तारांबाबत काय म्हणाले आहेत अजित पवार?

अब्दुल सत्तार यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले “आमच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार चुकीचं बोलले. यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा मलीन होते आहे. लोकं ऐकून घेत असतात आणि पाहात असतात.

आपण चहा, कॉफी विचारतो. तेव्हा आपण कुणी असं विचारत नाही की दारू पिता का? हे सहज बोलून गेलो म्हणतात असं चाल नाही. तुमच्यावर जबाबदारी आहे. अब्दुल सत्तारांचं सुप्रिया सुळेंबाबतचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. मंत्रिपदं येत असतात जात असतात. मात्र संविधान, कायदा, नियम यांचा आदर करायचा असतो. ” असं म्हणत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT