मित्रांनी रंग लावू नये म्हणून इमारतीच्या गच्चीत लपायला गेलेल्या तरुणाचा गच्चीतून पडून मृत्यू
मिथिलेश गुप्ता, अंबरनाथ: धुळवडीला मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाला आपल्याच चुकीमुळे जीव गमवावा लागला आहे. गच्चीतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये ही विचित्र घटना घडली आहे. या तरुणाचे नाव सूरज मोरे (वय 26 वर्ष) असं असून तो अंबरनाथ येथील शिवाजीनगर परिसरात राहत […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, अंबरनाथ: धुळवडीला मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाला आपल्याच चुकीमुळे जीव गमवावा लागला आहे. गच्चीतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये ही विचित्र घटना घडली आहे. या तरुणाचे नाव सूरज मोरे (वय 26 वर्ष) असं असून तो अंबरनाथ येथील शिवाजीनगर परिसरात राहत होता. ऐन सणाच्या दिवशी अपघात झाल्याने मोरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
अंबरनाथच्या शिवाजीनगर भागातील मधल्या आळीत सूरज मोरे हा 26 वर्षीय तरुण वास्तव्याला होता. धुळवडीच्या दिवशी सूरज हा त्याचा भाऊ तुषार मोरे याच्यासह दुपारी 1 वाजताच्या सुमारास अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या इमारतीजवळ गेला होता. यावेळी त्यांचे काही मित्र त्यांना दिसले. हे मित्र त्यांना रंग लावतील म्हणून सूरज आणि तुषार इमारतीमध्ये पळाले. तुषार महिल्या मजल्यावर लपला तर सूरज थेट गच्चीत जाऊन लपला.
पण याचवेळी इमारतीच्या गच्चीवरील डक्टमधून सूरज थेट खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या भावाने आणि मित्रांनी त्याला तातडीने अंबरनाथ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिथून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख करत आहेत.
