उकळत्या तेलातून नाणं काढ, हात भाजला नाही तरच तू पवित्र आहेस!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राला समाजसुधारकांची मोठी पंरपरा लाभली आहे. शेकडो वर्षांपासून राज्यात स्त्रियांना समान अधिकार व संधी मिळाव्यात यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात…पारधी समाजातील एका स्त्रीला आपलं खरेपण सिद्ध करण्यासाठी चक्क उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयाचं नाणं काढायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘मुंबई तक’ च्या हाती लागला आहे.

हा व्हिडीओ नेमका कोणत्या भागातला आहे, जुना आहे की नवीन आहे किंवा कोणत्या व्यक्तीचा आहे याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. परंतू पारधी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भोसले यांनी हा व्हिडीओ पारधी समाजातील धीज या अनिष्ठ आणि कुप्रथेचा असल्याचं सांगितलं आहे.

काय आहे धीज ही प्रथा??

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पारधी समाजातील स्त्रीचे समजा एखाद्या परपुरुषाशी संबंध असले तर घरातील पुरुष आधी तिला याबद्दल जाब विचारतात. यात महिलेने जर आपले कोणासोबतही संबंध नसल्याचं सांगितलं तर तिचं खरेपण सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात नाणं सोडून तिला ते नाणं हाताने बाहेर काढायला लावलं जातं. हे करत असताना महिलेचा हात भाजला नाही तर ती पवित्र आहे आणि जर तिचा हात भाजला गेला तर ती अपवित्र आहे असं समजलं जातं.

दरम्यान महाराष्ट्राचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही याप्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांनी याप्रकरणाच चौकशी करुन कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील पारधी समाजामध्ये ही कुप्रथा सुरु आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुनिता भोसले आणि त्यांचे कार्यकर्ते हा प्रकार नेमक्या कोणत्या भागात झालाय याचा तपास करत आहेत. ज्या भागात ही घटना घडली असेल तिकडे पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचंही भोसले म्हणाल्या. अशा घटनांविरोधात कडक कायदा करुन संबंधित पुरुषांवर कारवाई करण्याची मागणीही भोसले यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT