Bhagat Singh koshyari : राज्यपालांच्या विधानावरून मनसे आमदार राजू पाटलांचं भाजपकडे बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे गदारोळ सुरू आहे. राज्यपालांविरोधात राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून तीव्र रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर मनसे आमदार राजू पाटील यांनी भगतसिंह कोश्यारी यांना सुनावत भाजपकडे बोट दाखवलं आहे.

ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते म्हटलं. तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच पत्र लिहिली होती, त्याला माफीनामा म्हणायचं का, असं विधान केलं होतं.

भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावरून राजकीय गदारोळ सुरू असताना मनसेनं मात्र मौन बाळगल्याचं दिसत होतं. अखेर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या वादावर भूमिका मांडताना कोश्यारींना लक्ष्य केलंय.

हे वाचलं का?

राजू पाटील म्हणाले, “एक तर आपण काय इतिहास बदलू शकत नाही. काही गोष्टी माहित नसतात, त्याच्यावर उत्तरं दिली जातात. त्यावेळी जी परिस्थिती काय होती, त्या वेळेचे लिहिलेले पात्र त्याचे संदर्भ काय आहेत. अशा गोष्टींचा विचार न करता सरसकट मतं व्यक्त केली जातात. हे निवडणुका जवळ आल्यावरच जास्त होत असतं. कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलण्यापेक्षा भाजपने बोलायला पाहिजे. खरंतर कोश्यारी इथे आले, पण होशयारी तिकडेच ठेऊन गेलेत. त्यांना त्यांच्या होश्यारीची गळा भेट करायला त्यांना परत त्याच्या गावाला पाठवून द्यायला पाहिजे”, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणालेत.

अजित पवार भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर काय म्हणाले होते?

“महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील”, असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

“महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा समाचार घेतला होता.

ADVERTISEMENT

“राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे. त्याचबरोबर “राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना!”, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT