कुख्यात गुंड गजा मारणेला अटक, सातारा पोलिसांची मध्यरात्री कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तुरुंगातून सुटल्यानंतर तळोजा जेल ते पुण्यापर्यंत ५०० गाड्यांच्या ताफ्यातून जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजा मारणेला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. पुणे पोलिसांनी गुंगारा देऊन गजा मारणे साताऱ्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पोलीसांचं पथक त्याच्या मागावर होतं. अखेरीस मध्यरात्री साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला पोलिसांनी अटक केली आहे.

साताऱ्यात दाखल झाल्यानंतर गजा मारणे सुरुवातीला महाबळेश्वर भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर मेढा भागात मारणे आपल्या चार समर्थकांसह क्रेटा गाडीतून खुलेआम रस्त्यावर फिरत होता. पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या पथकाने सापळा रचत गजा मारणे व त्याच्या समर्थकांना अटक केली. यावेळी मारणे ज्या गाडीतून फिरत होता ती गाडी व दीड लाखाची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. मारणेसोबत असलेल्या सुनिल बनसोडे, संतोष शेलार आणि सचिन घोलप या साथीदारांनाही सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुरुंगातून सुटल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी त्याची काढलेली मिरवणूक ही एकाप्रकारे पोलीसांना दिलेलं आव्हान होतं. या मिरवणूकीनंतर मारणेविरोधात कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतू यात जामिन मिळवल्यानंतर पोलिसांनी मारणेविरोधात कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली. मोका अंतर्गत गजा मारणेवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा पावलं उचलायला लागली. याचाच एक भाग म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड, खालापूर पोलीस ठाण्यात गजा मारणेविरोधात पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले.

उर्से टोलनाक्यावर मिरवणुकीदरम्यान मारणे समर्थकांनी वडापाव आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे न दिल्यामुळे पोलिसांनी थेट त्याच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. आपल्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती समजताच गजा मारणे पुण्यातून फरार झाला होता. सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि अखेरीस शनिवारी मध्यरात्री सातारा पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT