शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात?; आयकर विभागाच्या मागणीने खळबळ

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. आमदार यामिनी जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील काही माहितीवर आयकर विभागाने संशय व्यक्त केला आहे. कर्ज प्रकरणातील अनियमिततेवर बोट ठेवत आयकरने मनी लाँडरिंगचा मुद्दाही उपस्थित केला. यामिनी जाधव यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने केली आहे.

आमदार यामिनी जाधव यांनी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळी यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आयकर विभागाला विसंगती आढळून आली आहे.

कोलकालास्थित असलेल्या शेर कंपनी आणि यामिनी जाधव यांचे पती व कुटुंबातील इतर व्यक्तींमध्ये व्यवहार झाल्याचंही समोर आलं आहे. जाधव यांचे पती आणि कुटुंबातील इतर व्यक्तींना अवैधपणे पैसे पुरवल्याचं आढळून आल्याचं आयकरने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमाप्रमाणे प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यास सांगितल्यानंतर आयकर विभागाच्या पाहणीत या बाबी समोर आल्या आहेत. यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञाप्रत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे शेल कंपनी असलेल्या प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून १ कोटी रुपये घेतल्याचं आढळून आलं. ही कंपनी एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून चालवली जात असल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

कोलकाता आणि तीन कंपन्या

ADVERTISEMENT

आयकर विभागाने केलेल्या उलटतपासणीत काही बाबी समोर आल्या आहेत. प्रधान डीलर्स फर्मच्या भागधारक दोन कंपन्या कोलकात्यात आहेत. यात पहिली कंपनी आहे स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि दुसरी सुपरसॉफ्ट सप्लायर्स लिमिटेड. चंद्रशेखर राणे, कृष्णा भंवरीलाल तोडी आणि धीरज चौधरी हे या कंपन्याचे संचालक आहे. तपासणी करत असताना प्रधान डिलर्स फर्म शेल कंपनी असल्याचं समोर आलं.

एंट्री ऑपरेटरचं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नाव

यासंदर्भात आयकरने आणखी खोलात जाऊन तपास केल्यानंतर हे संचालक एंट्री ऑपरेटर उदय शंकर महावार यांच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याचं स्पष्ट झालं. उदय शंकर महावार यांचं नाव नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही समोर आलं होतं. त्यावेळी यंग इंडिया नावाच्या कंपनी महावार यांच्या कंपनीने कर्ज दिलं होतं. याप्रकरणात आयकरने त्यांची चौकशीही केली होती. यात त्यांनी शेल कंपन्यांची माहिती पुरवण्यात सहभाग असल्याची कबूली दिली होती.

मुंबईच्या आयकर विभागाने नोंदवले जबाब

मुंबईच्या आयकर विभागाने प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीचे सध्याचे संचालक चंद्रशेखर राणे आणि पूर्वीच्या संचालकांपैकी प्रियेश जैन यांची जबाब नोंदवलेले आहेत. आपण या कंपनीचे डमी संचालक असल्याचं त्यांनी कबूल केलेलं असून, कंपनीचं नियंत्रण आणि व्यवस्थापन उदय शंकर महावार यांच्याकडे होते, असं त्यांनी आयकर विभागाला सांगितलं.

कंपनीचा ताब्या यशवंत जाधवांकडे

उदय शंकर महावार यांनी आयकर विभागाला दिलेल्या माहितीप्रमाणे या कंपनीचं हस्तांतरण यशवंत जाधव यांच्याकडे करण्यात आलं आहे. २०१८-१९ मध्ये (१८ डिसेंबर २०१८) ही प्रक्रिया सुरू झाली आणि २०१९-२० मध्ये (३१ जानेवारी २०२०) पूर्ण झाली. त्याचबरोबर यशवंत जाधव यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतरांना आवास असुरक्षित कर्जाच्या स्वरूपातून १५ कोटी रुपये दिले गेले असल्याचं आयकरला आढळून आलं आहे.

कंपनीच्या संचालकांनी आयकरला दिलेल्या माहितीप्रमाणे असुरक्षित कर्जे कंपनीच्या रोखीने देण्यात आली होती. ही रक्कम उदय शंकर महावार यांनी विविध मार्गांनी फिरवून प्रधान डीलर्स फर्मच्या कंपनीच्या नोंदीत आणली. हाच पैसा नंतर यशवंत जाधव यांच्या कुटुंबातील आणि इतर जवळच्या लोकांना पाठवण्यात आला असं या पडताळणीत आढळून आलं आहे.

यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम कर्ज स्वरूपातील नाही, तर हा त्यांचाच पैसा असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती चुकीची असल्याचं आयकर विभागानं नोंदवलं आहे. नॅशनल हेरॉल्ड, कर्ज अनियमितता आणि मनी लाँडरिंग केल्याचा ठपका ठेवत आयकर विभागाने यामिनी जाधव यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT