Indira Gandhi : पक्षातून हकालपट्टी झाली, चिन्ह गेलं; तरीही उधळला होता विजयाचा गुलाल

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षावर दावा ठोकला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? ते एकनाथ शिंदेंना मिळाले तर ठाकरेंचं काय होणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण, यापूर्वीही देशातील एका ज्येष्ठ नेत्यांना पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळालं नव्हतं. तरीही त्यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला होता. या नेत्या कोण होत्या? आणि ही घटना नेमकी काय होती? हेच जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी –

सालं होतं १९६९, त्या नेत्या होत्या देशाची आयर्न लेडी इंदिरा गांधी. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तरी पक्षावर काँग्रेसच्या काही वयोवृद्ध नेत्यांचं वर्चस्व कायम होतं. यामध्ये दक्षिणेतील काही नेते आणि मोरारजी देसाई यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. त्यालाच काँग्रेस सिंडीकेट म्हटलं जात होतं. या सिंडीकेटचा आपल्या दैनंदिन कामात हस्तक्षेप होऊ नये, असं इंदिरा गांधींना नेहमी वाटायचं. पण, त्यांना बाजूला कसं करायचं याचं नियोजन त्या आखत होत्या.

हे वाचलं का?

इतक्यात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच मृत्यू झाला. व्ही. व्ही. गिरी यांना राष्ट्रपती बनवण्याची इंदारीजींची इच्छा होती. पण, सिंडीकेट निलम संजीव रेड्डी यांच्या नावावर ठाम होतं. काँग्रेसकडून निलम संजीव रेड्डी हेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार होते. पण, इंदिरा गांधींनी बंड केलं आणि लोकसभेतील काँग्रेसच्या संसदीय नेत्या या नात्यानं काँग्रेस सदस्यांना व्हीप जारी करण्यास नकार दिला.

परिणामी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रेड्डी पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेस सिंडीकेटमधील सदस्य इंदिरा गांधींवर नाराज होते. मोरारजी देसाई यांना अर्थमंत्रीपदावरून काढल्यापासून या गटाचा राग होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर त्यांना इंदिरा गांधींना विरोध करण्याची आयती संधी मिळाली होती. त्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष निजलिंगप्पा यांनी इंदिरा गांधींना खुलं पत्र लिहिलं. या पत्रातून पक्षांअंतर्गत लोकशाही संपुष्टात आणल्याचा आरोप इंदिरा गांधींवर केला. त्यानंतर इंदिरा गांधी निजलिंगप्पा यांच्या बैठकांना जाणं टाळू लागल्या.

१२ नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या दोन बैठका झाल्या. एक पंतप्रधान निवासस्थानी आणि दुसरी जंतर मंतर रोडवरील काँग्रेसच्या कार्यालयात. या बैठकीत इंदिरा गांधींना काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यावरून काढून टाकलं आणि संसदीय पक्षाला आपला नवीन नेता निवडण्यास सांगितलं. काँग्रेसमधून इंदिरा गांधींची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचे दोन गट पडले. एक काँग्रेस (O) म्हणजेच संघटन आणि दुसरा काँग्रेस (R) म्हणजेच इंदिरा गांधींची काँग्रेस.

ADVERTISEMENT

निवडणूक चिन्ह बदलूनही दणदणीत विजय –

ADVERTISEMENT

काँग्रेसचं निवडणूक चिन्ह हे बैलजोडी होतं. पण, पक्षात फूट पडल्यानंतर हे मूळ आणि लोकप्रिय असं बैलजोडी चिन्ह काँग्रेस सिंडीकेटला मिळालं, तर इंदिरा गांधींच्या काँग्रेसला गाय वासरू हे चिन्ह मिळालं होतं. त्यानंतर १९७१ ला दोन्ही पक्षांनी निवडणुका लढवल्या.

इंदिरा गांधींच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह नवीन होतं, तरी इंदिरा गांधींचा मोठ्या मतांनी विजय झाला. तसेच काँग्रेस सिंडीकेटकडे पक्षाचं मूळ निवडणूक चिन्ह असून त्यांचा पराभव झाला होता. जनतेने निवडणूक चिन्ह नाहीतर इंदिरा गांधींना पाहून मत दिलं होतं, अशी चर्चा त्यावेळी होती. पुढे मूळ काँग्रेस संपली आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस उदयाला आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT