उस्मानाबाद जिल्ह्यातील हे गाव 6 दिवस जळत होते; रझाकारांचा प्रमुख कासीम रिझवीच्या भाच्याने केला होता कारस्थान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देश स्वातंत्र्य झाला तरी मराठवाडा 13 महिने पारतंत्र्यात होता. याठिकाणी निजामांचं राज्य होतं. निजामशाहीत रझाकार नावाची क्रूर संघटना होती. ज्याचा कासीम रिझवी हा प्रमुख होता. याच रझाकार संघटनाने उस्मानाबाद जिल्ह्यासह इतर ठिकाणी हैदोस माजवला होता. ज्या गावात निजामाच्या विरोधात चळवळ उभी राहिली, ते संपूर्ण गाव जाळण्याचा क्रूर कारस्थान रझाकारांनी केला होता. अशीच एक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवधानोऱ्यात घडली होती. या घटनेमुळे या गावचे नाव देवधानोराऐवजी जळकं धानोरा, असं पडलं आहे.

ADVERTISEMENT

भारत स्वातंत्र्य झाल्यापासून निजामाच्या राजवटीत स्वातंत्र्य संग्रामासाठीची चळवळ जोर धरू लागली होती. देवधानोऱ्यात देखील प्रभातफेरी काढणे, तिरंगा फडकवणे, भारताचा जय जयकार करणं सुरु झालं. त्यामुळं बाजूच्याच बोरवटी गावात राहणाऱ्या कासीम रिझवीचा भाचा गुंडूपाशा याचा या गावावर राग होता. इतर गावांप्रमाणे धानोरा गावातील लोक त्याला भीक घालत नव्हते. त्यामुळे या गावांवर त्याचा डोळा होता. म्हणून तो नेहमी या गावात येत जात असे.

रझाकारांना भीक घालायची नाही, गावकऱ्यांचं एकमत

देवधानोरा गावात इतर गावापेक्षा जास्त पैलवान होते. तसंच स्वातंत्र्यासाठी या गावातील अनेक तरुण पुढे आले होते. रझाकारांच्या अधिकाऱ्यांना वाकून आदाब करण्याचा फतवा होता. मात्र या गावातील लोकांनी रझाकारांना सलाम, आदाब करायचं नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आदाब केला नाही म्हणून एका सर्कल अधिकाऱ्याने येथील एकाला बुटाने खूप मारले होते. त्यावेळी अनेक गावकरी पुढे सरसावले होते. म्हणून गुंडू पशाचा राग आणखी वाढला होता.

हे वाचलं का?

संगीत बारीचं कारण सांगून घातला हैदोस

तो दिवस होता 17 एप्रिल 1948 रोजीचा. गुंडूपाशाने काही ना काही कारण काढून या गावाला अद्दल घडवायची, असे पक्के होते. त्यामुळे त्याने संगीत बारी करण्याच्या बहाण्याने काही लोकांना गावात पाठवलं. काही शेतकऱ्यांचा वेशात रझाकार गावात बैलगाडी घेऊन आले. बैलगाडीत कडब्याखाली बंदुका लपवल्या होत्या. संगीत बारीला गावच्या लोकांनी विरोध केला. गावात अजिबात नाचण्याचा कार्यक्रम होणार नाही, अशी भूमिका पोलीस पाटलांनी घेतली.

वार-प्रतीवर

पोलीस पाटील संगीत बारीला विरोध करत असल्याने त्यापैकी एकाने पोलीस पाटलानंवर काठीने वार केला. पाटलांना मारल्याची बातमी गावभर पसरली. तिथे असलेल्या जनार्धन बापूने पुढे येत कडब्याखालची बंदूक काढून ती त्या अमीनच्या डोक्यात घातली. गावात मारामारी सुरु झाली. तितक्यात गावातीलच फितुराच्या घरात बसलेला गुंडूपाशा आणि काही रझाकार तिथे बंदुका घेऊन आले आणि गावकऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला.

ADVERTISEMENT

गोळीबारात 15 जण जागीच ठार झाले

गुंडूपाशा आणि रझाकारांनी केलेल्या गोळीबारात 15 जण मरण पावले. गोळीबार सुरु होताच गावचे लोक घरदार सोडून पळून गेले. रझाकारांनी पळून गेलेल्या लोकांचे घरं लुटली. गावकऱ्यांनी सोलापूर हद्दीत असलेल्या तडवळा आणि चिंचोली कॅम्पमध्ये आश्रय घेतला. सोलापूर हा त्यावेळी स्वातंत्र्य भारताच्या हद्दीत येत होता.

ADVERTISEMENT

ट्रकभर रॉकेल आणत संपूर्ण गाव जाळलं

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 एप्रिल 1948 रोजी कळंबचा प्रमुख नवाब याने ट्रकभर रॉकेल देवधानोऱ्यात आणलं. तब्बल दोन हजार रझाकारांनी रॉकेल ओतून संपूर्ण गावाला आग लावली. सर्व गाव आगीच्या भक्षस्थानी आलं. सलग 6 दिवस देवधानोरा हे गाव जळत होतं. नंतर जेंव्हा गावकरी गावात परतले तेंव्हा राखेशिवाय त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. आजही या देवधानोरा गावाला पंचक्रोशीत जळकं धानोरा असं म्हणतात.

“हैद्राबाद मुक्तीसंग्रामात असं झुंजलो आम्ही”, या पुस्तकात वरील सर्व घटनाक्रम इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. सतीश कदम यांनी लिहलं आहे. त्यांनी तब्बल चार वर्ष अभ्यास करून या पुस्तकाचं लेखन केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT