मराठी सिने-मालिकांमधल्या लाडक्या आजी रेखा कामत यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रत्येकाला हवीहवीशी वाटणाऱ्या आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं आज निधन झालं आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

ADVERTISEMENT

रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोन सख्ख्या बहिणी आहेत. या दोन्ही बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवला आहे. ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘अग्गंबाई अरेच्चा’ हे रेखा यांचे गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘एकच प्याला’, ‘संशयकल्लोळ’ यांसारख्या संगीत नाटकांतून तसंच ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमाच्या गावे जावे’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ यांसारख्या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती.

रेखा यांनी बहीण चित्रा यांच्यासोबत शाळेत असतानाच नृत्य आणि गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. प्रसिद्ध नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. नृत्यनाटिकेतून या दोघी बहिणींना थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं.

हे वाचलं का?

१९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट. यामध्ये चित्रा यांनीसुद्धा काम केलं होतं. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फटके या त्रिमूर्तींचा हा चित्रपट होता. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावं नकोत, चित्रपटासाठी जरा आकर्षक नावं पाहिजेत म्हणून ‘गदिमां’नी रेखा आणि चित्रा असं नामकरण केल्याचं, त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. याच नावांनी त्यांनी मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि पुढे हीच नावं त्यांची ओळख बनली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT