Narayan Rane यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा फायदा कुणाला? भाजपला की शिवसेनेला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रविवारी संपली आहे. मागचा संपूर्ण आठवडा ही जन आशीर्वाद यात्रा चांगलीच गाजली. कारण नारायण राणे यांनी या यात्रेत सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यानंतर शिवसेनेनेही या संधीचा उपयोग केला आणि शक्ती दाखवली. त्यानंतर मागच्याच बुधवारी नारायण राणेंना अटकही करण्यात आली. त्यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतरही राणेंनी शिवसेनेवर टीका करणं सोडलं नाही. अशात नारायण राणेंच्या या जनआशीर्वाद यात्रेचा फायदा भाजपला झाला की शिवसेनेला हा प्रश्न चर्चिला जातो आहे.

ADVERTISEMENT

मुंबई तकने या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांच्याशी चर्चाही करण्यात आली. त्यांनी या सगळ्या चर्चेत काय मतं मांडली. अडवाणींची रथयात्रा थांबवली आणि देशाचं राजकारण ढवळून निघालं. आता नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला रथयात्रा नाही म्हणता येणार पण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं विविध पडसाद उमटले. असे पडसाद दूरगामी असतात. त्याबाबत काय सांगाल? पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजपला काय फायदा होईल?

शिवसेनेबाबत संजय आवटे म्हणाले, शिवसेनेला याचा फायदाच होणार आहे. शिवसेना सायकॉलॉजिकल वॉरफेअर करणारा पक्ष आहे. शिवसेनेला प्रस्थापित अशा अर्थाने आयडियॉलॉजी नाही. शिवसेनेची कोणतीही लिखित संहिता नाही की हे म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना वैचारिक मांडणी, भूमिका आहे असं नाही. ते एक परसेप्शन तयार करतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा शिवसेनेला हा मुद्दा मिळतो तेव्हा शिवसेना पुढे गेली आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेचं व्यक्तिमत्व हे विरोधी पक्षासारखं आहे. मागच्या पाच वर्षातही शिवसेना सत्तेत होती.. मात्र सत्तेत राहूनही त्यांचा सूर विरोधी बाकांवर बसल्यासारखाच होता. शिवसेना संघटना म्हणून यशस्वी आहे, मात्र सत्ता त्यांना मानवत नाही. आता शिवसेनेची स्थिती थोडी वेगळी आहे. शिवसेना आता नुसती सत्तेत नाही तर मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरे प्रमुख असताना मनोहर जोशी, नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा जर काही चुका झाल्या तर बाळासाहेब ठाकरे त्यांना हे सांगू शकत होते की असं मला चालणार नाही. आता तशी स्थिती नाही. उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुखही आहेत आणि मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा सूर हा काहीसा नरमला. सगळ्या कार्यकर्त्यांचं हे म्हणण होतं की आम्ही सत्तेत असूनही आम्हाला पूर्वीसारखं आक्रमक होता येत नाही.

या सगळ्यामध्ये लॉकडाऊन, कोरोना ही संकटं आली. या सगळ्या कालावधीत शिवसेना थंड होती. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला नवसंजीवनी मिळणं, शिवसेनेमध्ये प्राण येणं त्यासाठी काहीतरी घडणं हे आवश्यक होतं. नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेने हे कारण त्यांना मिळवून दिलं. शिवसैनिकांनी पुन्हा त्यांचा लढवय्या बाणा दाखवून दिला. त्यामुळे या यात्रेचा फायदा शिवसेनेला जास्त होईल.

ADVERTISEMENT

नारायण राणेंना केंद्रीय मंत्री केल्याने शिवसेनेला त्रास होणार आहे. मात्र नारायण राणे हे भाजपसाठी अॅसेट ठरणार नाहीत हे मी लिहिलं होतं ते शब्द खरं झालं आहे. शिवसेनेला नारायण राणेंच्या निमित्ताने पुन्हा नवसंजीवनी मिळाली. अनेक सक्रिय नसणारे शिवसैनिक जागे झाले. शिवसेनेला चैतन्य मिळालं असं दिसतं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेला पक्ष म्हणून फायदा झाला आहे हे तुम्ही म्हणता आहात, पण शिवसेनेला आयतं कोलित मिळालं असंही म्हणता येईल. मात्र भाजपचं शंभर टक्के नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. नारायण राणेंमध्ये शिवसैनिक दडलेला आहे. नुकसान झालं तर नारायण राणेंचं आणि फायदा झाला तर भाजपला असं गणित आहे. भाजपला याचा फायदा होतो आहे असंही दिसतं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही याचा फायदा होईल का?

संजय आवटे यांनी असं म्हटलं आहे की नाही पक्ष म्हणून याचा फायदा भाजपला होणार नाही. जो भाजपचा केडर आहे तो नारायण राणेंना बाहेरचा मानतो भाजपचा मानतच नाही. बाहेरचे लोक भाजपमध्ये गेल्याने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यात बाहेरून पक्षात आलेले चेहरे होते.त्यामुळे पक्षाचं जे पारंपरिक केडर आहे ते मागच्या बाकांवर गेलं त्यामुळे नाराजी, अस्वस्थता वाढणं स्वाभाविक आहे. देवेंद्र फडणवीस यांचं धोरण हम करे सो कायदा असा आहे. पंकजा मुंडेंना डावललं, भागवत कराडांना संधी दिली. बावनकुळे, विनोद तावडे यांना तिकिट मिळालं नाही. त्यामुळे आता बघा काय होतंय अशी धारणा भाजपमध्ये वाढली आहे. मूळातला भाजपचा कार्यकर्ता नारायण राणेंना कनेक्ट होणं शक्य नाही. फडणवीसांनाही पुढे येऊन सांगावं लागलं की जे विधान राणेंनी केलं त्याला आम्ही पाठिंबा देत नाही. पण राणेंच्या पाठिशी आम्ही आहोत हे सांगावं लागलं त्यामुळे भाजपचा यात तोटा झाला आहे असं वाटतं आहे. भाजपमध्ये आतले विरूद्ध बाहेरचे असा जो संघर्ष आहे तो आणखी वाढण्याची चिन्हं दिसून येत आहेत. नारायण राणेंमुळे फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचं हसं झालं आणि कोंडीही झाली आहे असंच दिसतं आहे.

पहाटेचा शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांचं जे हसं झालं त्यानंतर वारंवार तशाच प्रकारच्या घटना घडत आहेत असं दिसतं आहे. त्यामुळे केंद्रातही त्यांचं महत्त्व कमी होऊ शकतं. त्यामुळे संघटन म्हणून भाजपला फटकाच बसणार आहे असंही संजय आवटेंनी म्हटलं आहे.

पण पक्षात लोक येणं, बाहेरचे आतले असा संघर्ष असणं हे असतंच. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा जो सेल्फ गोल केला असं जे तुम्ही म्हणता आहात, असं असेल तर बाहेरच्या लोकांना पद देणं की प्रवेश देणं बंद करावं लागेल का?

संजय आवटे म्हणतात, भाजपमध्ये आल्यानंतर पद मिळणं बाहेरून आल्यानंतर पद मिळणं हे गरजेचं होतं. मात्र त्यांचं महत्व वाढवल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला गेला पाहिजे. नारायण राणे यांचा पराभवही अनेकदा झाला आहे. नारायण राणे यांचं उपद्रवमूल्य किती आहे, त्यांना किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं गेलं पाहिजे. नवा चेहरा उभा करायचा असेल तर जुन्या चेहऱ्यांना डावलायचं नसतं. नारायण राणेंनी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली असती आणि मग त्यांना इतकं महत्व दिलं पाहिजे. विनोद तावडे कुठे आहेत माहित आहे का? आतले आणि बाहेरचे हा संघर्ष सुरूच राहतो त्यामुळे पक्षाच्या व्यक्तिमत्व निर्माण होण्यावर होतो.

बाहेरच्या लोकांना घेऊन भाजपने पाहुण्याच्या काठीने विंचू मारायचा हे धोरण भाजपने अंगिकारलं आहे ? असं वाटत नाही का? या प्रश्नावर संजय आवटे यांनी म्हटलं आहे की अगदीच हे धोरण योग्य आहे. मात्र त्यासाठी त्या नेत्याची उपयुक्तता किती शिल्लक राहिली आहे पाहिलं आहे. बेताल वक्तव्यं करणं म्हणजे विरोध दर्शवणं नाही. भाजपने त्यांना नेमकं समजावून द्यायला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नारायण राणेंचा उपयोग झाला त्यांनी अशा प्रकारे भूमिका घ्यायला नको होती. पाहुण्याच्या काठीने साप मारायला हरकत नाही पण ती काठी आपल्याच पायावर पडते आहे का? याचा विचार पक्षाने करायला हवा होता. गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ हे लोक जशा भूमिका घेत आहेत त्यांनी त्या तशा घेणं आवश्यक आहे. नारायण राणेंना अशा प्रकारे समोर करून भाजपने मात्र स्वतःचं हसं करून घेतलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT