आयकर विभागाच्या धाडींमुळे चर्चेत असलेले अभिजित पाटील आहेत तरी कोण?
आयकर विभागाच्या धाडीमुळं सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार अभिजित पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. सोमवारी भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. त्यामुळं अभिजित पाटील आता भाजपात जाणार का अशा देखील चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. मात्र अल्पावधीत प्रकाशझोतात आलेले अभिजित पाटील हे आहेत तरी कोण आणि […]
ADVERTISEMENT
आयकर विभागाच्या धाडीमुळं सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार अभिजित पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. सोमवारी भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. त्यामुळं अभिजित पाटील आता भाजपात जाणार का अशा देखील चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. मात्र अल्पावधीत प्रकाशझोतात आलेले अभिजित पाटील हे आहेत तरी कोण आणि इतकं साम्राज्य त्यांनी कसं उभं केलं, हे आपण पाहणार आहोत.
ADVERTISEMENT
सुरुवात वाळू आणि ऊस वाहतूक ठेकेदारीतून केली
38 वर्षाचे डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजित पाटील हे उच्च शिक्षित आहेत. पंढरपुरातील देगावत त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी सुरुवातीला ऊस वाहतुकीच्या ठेकेदारी व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वाळूच्या ठेकेदारीचा व्यवसाय देखील सुरु केला. वाळू प्रकरण त्यांना चांगलंच भोवलं . विशेष म्हणजे तुकाराम मुंढेंनी अभिजीत पाटलांच्या वाळू तस्करीवर धडक कारवाई केली होती. तुकाराम मुंढेंनी केलेल्या कारवाईनंतर अभिजीत पाटील यांना तीन महिने तुरुंगवासही झाला.
हे वाचलं का?
जेलवारीनंतर ट्रॅक बदलला
वाळू व्यवसाय प्रकरणात जेलवारी करून आल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा मार्ग बदलला. साखर कारखानदारीमध्ये त्यांनी प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरखळी येथे धाराशिव कारखाना उभा केला. त्यात त्यांना चांगलं यश आलं. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. साखर कारखानदारीत त्यांनी आपला ठसा उमटवत उस्मानाबाद, नांदेड, नाशिक, सांगोला, पंढरपूर या ठिकाणी पाच कारखाने सुरु केले.
ADVERTISEMENT
विठ्ठल सहकारी साखर कारखाना 21 पैकी 20 जागा जिंकून आले प्रकाशझोतात
ADVERTISEMENT
अवघ्या काही वर्षात त्यांना मोठं यश कारखानदारीत मिळू लागलं. त्यांनी बंद पडलेला सांगोला सहकारी कारखाना राज्य सहकारी बँकेकडून चालवायला घेतला. अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. याच कारणामुळे आपल्यावर कारवाई झाल्याचं अभिजित पाटील आत्ता सांगतायत.
अभिजित पाटलांचं साम्राज्य
सध्या अभिजीत पाटलांकडे धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद), धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड), वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड, नाशिक आणि सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (पंढरपूर, सोलापूर) या चार कारखान्यांची मालकी आहे. शिवाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर त्यांचं नियंत्रण आहे. यासह डीव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमाने मल्टीस्टेट बँकदेखील सुरु केल्या.
पाटलांचा धाराशिव कारखाना ऑक्सिजन निर्मिती करणारा देशातील पहिला ठरला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्मिती करण्याचे आवाहन केले होते. त्यादरम्यान वाढत्या ऑक्सीजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन ऑक्सीजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित केला होता. त्यावेळी हा कारखाना मोठ्या चर्चेत आला होता.
अभिजित पाटील आहेत आमदार कैलास पाटलांचे भाचे
कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेने आमदार कैलास पाटील हे नात्याने अभिजित पाटील यांचे मामा लागतात. कैलास पाटील यांनी सुरतेहून परत येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याच भाच्याच्या उद्योगांवर आयकर विभागाच्या कारवाईने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र यावर अजूनतरी कैलास पाटील यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT