अशोक चव्हाणांनी एकनाथ शिंदेंबाबत ‘तो’ गौप्यस्फोट करण्यामागचं टायमिंग का महत्त्वाचं आहे?
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आघाडी सरकारमधील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. या वक्तव्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी करुन ठेवली आहे. २०१४ मध्ये युती सरकारच्या काळातच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. हे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे त्याच्या टायमिंगचीही […]
ADVERTISEMENT
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आघाडी सरकारमधील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. या वक्तव्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी करुन ठेवली आहे. २०१४ मध्ये युती सरकारच्या काळातच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. हे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे त्याच्या टायमिंगचीही चर्चा सुरू आहे. राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं. अशोक चव्हाण यांनी हे टायमिंग आत्ताच का साधलं? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
अशोक चव्हाणांनी आत्ताच गौप्यस्फोट का केला?
अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला आहे त्यात टायमिंग महत्त्वाचं आहे. मुळात अशोक चव्हाण हे असे नेते नाहीत जे गौप्यस्फोट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशोक चव्हाण यांचा तो स्वभाव नाही. अशोक चव्हाण तोलूनमापून आणि आपल्यावर काही येऊ नये याचा प्रयत्न करत आस्ते कदम भूमिका घेणारे नेते आहेत. २०१९ ला शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जायचं आहे की नाही? याबाबत मनात असूनही अशोक चव्हाण यांनी उघडपणे भाष्य केलं नव्हतं.
सोनिया गांधींकडे अशोक चव्हाण यांनी काय सांगितलं होतं? ते माहित नाही. मात्र उघडपणे किंवा माध्यमांसमोर अशोक चव्हाण आत्तापर्यंत कधीही उघडपणे काहीही बोलले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी हेच कारण दिलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायला नको होतं. या कारणातूनच जो उठाव किंवा बंड झालं आहे. अशात या कारणालाच छेद देण्याची भूमिका कुठेतरी अशोक चव्हाण पार पाडताना दिसत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार काय म्हटलं आहे?
एकनाथ शिंदे हे सातत्याने सांगत आहेत की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत नव्हतं. मी उद्धव ठाकरेंना पाचवेळा सांगितलं होतं की आपण हा प्रयोग नको करायला किंवा यातून बाहेर पडू आणि भाजपसोबत जाऊ. मात्र माझं म्हणणं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.
अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने टर्न
एकीकडे दसरा मेळाव्याचं मैदान उद्धव ठाकरेंना मिळणं. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने निवडणूक आयोग पक्ष कुणाचा हा निर्णय घेईल असा निर्णय देणं. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी केलेला हा गौप्यस्फोट या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण राजकारणात टायमिंग महत्त्वाचं मानलं जातं ते आता अशोक चव्हाण यांनी साधलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण यांच्याविषयीही चर्चा सुरू होत्या की अशोक चव्हाण काही आमदारांचा गट घेऊन भाजपमध्ये जाऊ शकतात का? त्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली ही भूमिका मान्य नाही हे एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. मात्र एकनाथ शिंदेच काँग्रेसमध्ये यायला तयार होते हे सांगून अशोक चव्हाण हे एकनाथ शिंदेच कसे दुटप्पी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न तो शब्दप्रयोग न करता करत आहेत.
ADVERTISEMENT
२०१४ मध्ये काय घडलं होतं? उद्धव ठाकरे शरद पवारांवर का चिडले होते?
२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यानंतर जे निकाल लागले त्यात भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी युतीही तुटली होती. अशात भाजप आपल्याकडेच येईल असं उद्धव ठाकरेंना वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही कारण होती ती शरद पवारांची खेळी. निकालाच्या दिवशीच शरद पवारांनी जाहीर केलं होतं की राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच संपली. सुरूवातीला शिवसेना विरोधात आणि नंतर सत्तेत येऊन बसली. युतीचं सरकार पाच वर्षे धुसफूसतच चाललं. त्याचं पहिलं कारण शरद पवारांनी केलेली ही खेळी होती. शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे चांगलेच चिडले होते.
२०१४ ला राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे संबंध शरद पवारांच्या खेळीमुळे ताणले गेले होते. २०१७ या वर्षाचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यावेळी महापालिका निवडणुका होत्या. मुंबईच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष समोर आला होता. तो विकोपाला गेला होता. मुंबई महापालिका आपल्या हातातून जाऊ शकते अशी भीती तेव्हा उद्धव ठाकरेंना वाटली होती त्यामुळे ते अशोक चव्हाणांकडे प्रस्ताव घेऊन गेले असावेत. मात्र या सगळ्या गोष्टी आत्ता बाहेर काढण्यामागे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं खोडून काढणं हे आहे. तसंच आपल्याबद्दलच्या चर्चा थांबवणं याचाही हा सूचक प्रयत्न आहे.
ADVERTISEMENT