राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं संकट पुन्हा एकदा ठाण मांडून उभं असताना शाळा-कॉलेजच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले. परंतू गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात इंटरनेटची चांगली सोय नसल्यामुळे कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांना चक्क छतावर आणि जंगलात जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली आहे. त्यामुळे कोरची तालुक्यात इंटरनेटची चांगली सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे त्रासाचा सामना करावा लागत आहे.
गडचिरोलीमधील कोरची तालुक्यात वारंवार विजेचा लंपडाव आणि इंटरनेट बंद पडण्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगली रेंज मिळावी यासाठी कधी जंगलात तर कधी घराच्या छतावर जाऊन परीक्षा द्यावी लागत आहे. या त्रासाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही यात काहीही तोडगा निघत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेज बंद असताना ऑनलाईन परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना अशी कसरत करावी लागत असल्यामुळे आपल्या शैक्षणिक भवितव्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ मार्च ते २७ मार्च पर्यंत तालुक्यातील बी.ए. आणि बी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांची परीक्षा 75 मिनिटांची घेण्यात येईल असं ठरलं. यासाठी 50 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंटरनेट विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसून आला. काही विद्यार्थी छत्तीसगड राज्यात तर काही लगतच्या देवरी, वडसा, चिचगड सारख्या ठिकाणी इंटरनेट अभावी परीक्षेकरिता गेले होते. विस्कळीत झालेल्या इंटरनेटच्या सुविधेमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले. सध्यातरी विद्यापीठ प्रशासनाकडे यासाठी कुठलेही उत्तर नाही.