ठाणे: महापौर, आमदार यांनी नियम डावलून घेतली कोरोना लस, भाजपचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘कोरोना आपत्तीच्या काळात ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोनाची लस घेतली. महापौर नरेश म्हस्के यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली कोरोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. ठाण्याच्या इतिहासात नरेश म्हस्के यांच्यासारखा नियम डावलणारा महापौर झाला नाही, अन् होणारही नाही.’ अशी जोरदार टीका भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वाना समजण्यासाठी लस घेतली असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखविणार का? असा सवालही डुंबरे यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे महापालिकेने उभारलेल्या विशेष कोविड हॉस्पिटलमध्ये 20 फेब्रुवारी रोजी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी कोरोनाची लस घेतली होती. तसेच आपले फोटोसेशन करून घेतले होते. या प्रकाराला मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपच्या गटनेत्याचा महापौरांवर हल्लाबोल

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात कोरोनाशीच युद्ध करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोना लस दिली जात आहे. त्यात फ्रंटलाईन वर्कर्स व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे नगरसेवक वा कोणताही लोकप्रतिनिधी यांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश केलेला आहे. असे असतानाही महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांनी बेकायदेशीरपणे कोरोना लस घेतली. असा आरोप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला.

ADVERTISEMENT

ही बातमी पाहिली का?: गुड न्यूज: 1 मार्चपासून ‘यांना’ दिली जाणार कोरोनावरील मोफत लस

ADVERTISEMENT

‘कोरोना लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य व पोलिसांबरोबरच लोकप्रतिनिधींचाही समावेश करावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २ डिसेंबर रोजी केली होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. मात्र, आपल्या पदाचा गैरवापर करीत नरेश म्हस्के व रवींद्र फाटक यांनी रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकून स्वत:ला लस टोचून घेतली.’ असा आरोप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. केवळ स्वार्थापोटी वैयक्तिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा असा महापौर झाला नाही व भविष्यातही होणार नाही. असा टोलाही डुंबरे यांनी लगावला आहे.

मनोहर डुंबरे यांनी असाही दावा केला आहे की, महापौर कार्यालयातून माझ्याकडे कोविड लस घेण्यासाठी पॅनकार्ड व आधारकार्डची प्रत मागण्यात आली होती. भविष्यातील लसीकरणासाठी यादी तयार केली जात असल्याचे मला वाटले होते. पण त्यानंतर लगेच मला लस घेण्याची सूचना करण्यात आली. या संदर्भात सरकारी यंत्रणांकडे चौकशी केल्यावर केवळ फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मी लस घेतली नाही. मात्र, महापौरांनी बेकायदेशीररित्या लस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. असंही डुंबरे म्हणाले.

‘लस घेतली म्हणजे मी काही चोरी केली नाही, आम्ही सुद्धा फ्रंटलाईन वर्करच आहोत’

दरम्यान, याबाबत महापौर नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया देखील ‘मुंबई तक’ने जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपली बाजू मांडताना असं म्हटलं आहे की, ‘आम्ही गेले अनेक दिवस कोरोनाग्रस्त भागात काम करत आहोत. त्यामुळेच आमच्यासारखे सर्वच लोकप्रतिनिधी हे फ्रंटलाइन वर्कर आहेत. आमच्या नावाची रितसर नोंदणी झाली होती आणि त्यानंतरच आम्हाला ही लस देण्यात आली. लसीबाबत सुरुवातीला अनेक फ्रंटलाइन वर्कर्संना भीती वाटत होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी मी आणि आमदार रवींद्र फाटक यांनी लस घेतली. जे माझ्यावर टीका करत आहेत ते स्वत:च या लसीसाठी माझ्या कार्यालयात आपली कागदपत्रं देऊन गेले आहेत. मी काही गुपचूप जाऊन लस टोचून घेतली नाही किंवा चोरी केली नाही. लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठीच लस टोचली आणि लोकप्रतिनिधी कुणीही असो सध्याच्या काळात तो फ्रंटलाइन वर्करच आहे. पण आता शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी भाजपकडून राजकारण सुरु आहे.’ अशी प्रतिक्रिया महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

दरम्यान, याचवेळी नरेश म्हस्के यांना आम्ही असाही प्रश्न विचारला की, अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी लस घेतलेली नाही. मात्र आपण लस घेतली. यावर बोलताना महापौर असं म्हणाले की, ‘मी फार लहान कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री हे फार मोठे नेते आहेत. त्याच्याविषयी मी काय बोलणार? पण मी लस घेतली म्हणजे काही चोरी तर केली नाही ना?’ असंह ते म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT