उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घराबाहेर एक स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं होतं. या प्रकरणाने पुढे अनेक वळणं घेतली. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ ही मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणात आता सचिन वाझे यांच्यावरही काही आरोप झाले आहेत. विधानसभेतही या प्रश्नावरून चांगलीच चर्चा रंगली. आता अँटेलिया बाहेर कार सोडणाऱ्या संशयिताचा फोटो समोर आला आहे. या संशयिताने PPE KIT घातलं होतं हे या फोटोवरून आता स्पष्ट झालं आहे.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ (अँटेलिया) 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडे सहा-सात वाजेच्या सुमारास एक संशयित कार आढळून आली होती. या कारबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची तपासणी केली होती. त्यावेळी कारमध्ये काही जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या.
जेव्हा याबाबतची माहिती माध्यमांसमोर आली तेव्हा संपूर्ण देशात अक्षरश: खळबळ उडाली. एवढंच नव्हे तर त्याच दिवशी पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज देखील लागलं. ज्यामध्ये दिसून आलं की, एका व्यक्तीने स्कॉर्पिओ कार अँटेलिया बाहेर पार्क केली होती आणि नंतर तो मागे उभ्या असलेल्या इनोव्हा कारमधून निघून गेला होता.
या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रांचकडे चौकशीसाठी सोपवलं होतं. तेव्हा या प्रकरणाचे तपास अधिकारी हे सचिन वाझे हे होते.