अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या कारकीर्दीतला ३ केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनाचं संकट आल्यापासून सीतारामन यांनी आतापर्यंत ५ छोटेछोटे मिनी बजेट सादर करत अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. या पार्श्वभूमीवरच यंदा केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प खास ठरतोय. यंदाच्या बजेटमध्येही सरकारनं काही घोषणा केल्यात. या घोषणांचं इलेक्शनशी कनेक्शन जोडलं जातंय.
सत्ताधारी भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मिशन बंगालची सुरवात केलीय. या मिशन बंगालचं कनेक्शन आपल्याला बजेटच्या घोषणांमध्येही दिसतात. बजेट भाषणाच्या सुरवातीलाच निर्मला सीतारामन यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतल्या पंक्तींचा उल्लेख केला.
बजेटमध्ये सरकारने पश्चिम बंगालमध्ये हायवेच्या बांधणीसाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची घोषणा केलीय. तसंच आसामसाठी ३४ हजार कोटी दिले जाणार आहेत. पुढच्या ३ वर्षांत हायवे बांधणीचं हे काम पूर्ण करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलीय. तसंच तामिळनाडूत रस्ते बांधणी आणि इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय.
महाराष्ट्राला कन्याकुमारीशी जोडणारा मुंबई-कन्याकुमारी हायवेही बांधण्यात येणार आहे. यासाठी सरकारने ६४ हजार कोटींची तरतूद केलीय. चेन्नई मेट्रोच्या कामासाठीही सरकारनं निधीची घोषणा केलीय. सोबतच केरळमधल्या कोची मेट्रोलाही सरकारकडून अर्थपुरवठा करण्यात येणार आहे. आगामी काळात निवडणूक होऊ घातलेल्या केरळमध्येही ६५ हजार रुपये खर्चून नॅशनल हायवेची बांधणी केली जाणार आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या चार घटकराज्यांसोबतच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभेची निवडणूक होणार आहे. यातल्या बहुतेक विधानसभांचा कार्यकाळ हा मे-जूनमध्ये संपतोय. त्यामुळे इथे एप्रिल-मे महिन्यात निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरचं बजेटमधल्या घोषणांचं इलेक्शन कनेक्शन जोडण्यात येतंय.