पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत आज भावूक झालेले पहायला मिळाले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतला कार्यकाळ आज संपला. गुलाब नबी आझाद यांच्या अखेरच्या दिवशी निरोप समारंभादरम्यान सर्वपक्षीय नेत्यांनी भाषण करत त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल भाष्य केलं.
काही वर्षांपूर्वी गुजरातमधील काही व्यक्ती काश्मिरमध्ये अतिरेकी हल्ल्यात अडकले होते. त्यावेळी त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी गुलाम नबी आझाद आणि प्रवण मुखर्जी यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचे हे प्रयत्न आपण कधीच विसरु शकणार नाही असं म्हणत असताना मोदी राज्यसभेत भावूक झाले.
यावेळी बोलत असताना गुलाम नबी आझाद यांचा उल्लेख खरा मित्र असं करताना नरेंद्र मोदी यांनी, आझाद यांनी खासदार आणि विरोधी पक्षनेता म्हणून नेहमी आपलं वेगळेपण सिद्ध केल्याचं म्हटलं. सत्ता येते, मोठी पदं मिळतात, सत्ता हातातून जाते या सर्व गोष्टी कशा सांभाळायच्या हे गुलाम नबी आझाद यांच्याकडून शिकणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले.
संसदेत गुलाम नबी आझाद यांनी स्वतःचं वेगळेपण नेहमी सिद्ध केलं आहे. पक्षाची चिंता करण्यासोबतच सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे पार पडावं याकडेही त्यांचं विशेष लक्ष असायचं. भविष्यकाळात गुलाम नबी आझाद यांचं कार्य येणाऱ्या खासदारांना नक्कीच प्रेरणा देईल असं म्हणत मोदी यांनी आझाद यांचं कौतुक केलं.